Green Technology
Esakal
डॉ. प्रमोद चौधरी
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू! शेतकरी शेतातला कचरा फेकून देण्याऐवजी त्यातून इंधन तयार करतो. इथले उद्योगधंदे कार्बन उत्सर्जन कमी करून जागतिक बाजारपेठेत पाय रोवतात. तरुण अभियंते आणि तंत्रज्ञ हरित तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देतात आणि त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सामान्य माणसं हरित इंधनाचे पर्याय निवडतात, तेव्हा ते सीमोल्लंघन नाही तर दुसरं काय असतं?
दसरा आणि सीमोल्लंघन हे समीकरण रूढ आहे. सीमोल्लंघन म्हणजे शब्दशः एखादी सीमा ओलांडणं... आपणच आपल्याला घालून घेतलेली मर्यादा ओलांडणं आणि नव्या दिशेला प्रवास सुरू करणं. थोडं अजून सोपं करून हल्लीच्या पिढीच्या भाषेत सांगायचं, तर सीमोल्लंघन म्हणजे आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडणं.
कम्फर्ट झोन हा शब्दप्रयोग नवीन असला, तरी सीमोल्लंघन मात्र आपल्याला नवीन नाही. दसऱ्याच्या दिवशी आपण सगळेच सीमोल्लंघन करतो. वर्षानुवर्षे करत आलो आहोत. सीमेवर जाऊन लढाई करायचा, आपल्या सीमांचं रक्षण करायचा काळ होता, तेव्हा लोक वेगळ्या अर्थानं सीमोल्लंघन करत होते. आता काळ बदलला आहे. सीमोल्लंघनाचे जुने संदर्भ बदलले आहेत आणि नवे निर्माण झाले आहेत. म्हणून सीमोल्लंघन करताना जुनं सोडून द्यायचं असं मात्र अजिबात नाही.