सुहास परांजपे
धकाधकीच्या, स्पर्धेच्या रुटीनला कंटाळून सगळ्यापासून दूर चार-पाच दिवस कुठंतरी जावंसं वाटतं. मग कुठं जायचं असा विचार मनात आल्यावर पर्यटकांनी भरलेली, गर्दी असलेली तीच तीच ठरावीक ठिकाणं आठवतात.
नवीन ठिकाणी जायचं म्हटलं तर बरेच प्रश्न उभे ठाकतात... ते ठिकाण कसं असेल? राहायची सोय चांगली असेल का? जेवण कसं असेल? एक ना अनेक. एखादं नवीन ठिकाण इंटरनेटवर शोधून त्याची माहिती मिळवण्यात काही दिवससुद्धा जाऊ शकतात.
म्हणूनच ही मी स्वतः जाऊन आलेल्या, गर्दी कमी असलेल्या, थोडं अपरिचित, पण निसर्गानं नटलेल्या अशा अनोख्या गावाची सफर! हे ठिकाण फारसं प्रसिद्ध नसल्यानं या टूरचा एकूण खर्चही इतर मोठ्या ठिकाणांपेक्षा कमी येतो. हे ठिकाण म्हणजे शोजा!
इथं तुम्ही संध्याकाळी बाहेर खुर्ची टाकून, हातात कॉफीचा मग घेऊन पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू शकता, त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करू शकता; त्याचबरोबर एकमेकांशी मस्त निवांत गप्पा मारत वेळ घालवू शकता. रात्री ताऱ्यांनी भरलेलं आकाश तासनतास बघत राहावं असं वाटत असेल, तर ती इच्छाही इथं पूर्ण होऊ शकते...