Sindhudurg : सूर्यास्ताच्या साक्षीने पाहिलेला हा मालवण समुद्र किनारा कायमचा स्मृतीत राहील..

लांबलचक समुद्र किनारा, हिरवीकंच झाडी, नयनरम्य पर्वत; आंबा, काजू, फणस, नारळ, पोफळी सर्वांगावर बाळगत दिमाखात वावरणारा असा सिंधुदुर्ग जिल्हा!
sindhudurg
sindhudurgesakal

अपर्णा सावंत

छोटे छोटे गुळगुळीत काळे रस्ते, दुतर्फा नारळ, पोफळी, काजूची झाडं, त्या झाडांच्या गर्दीत दिसणारी उतरत्या छपरांची कौलारू घरं, मधेच दिसणारी हिरवीगार शेतं... सगळा नजारा मन प्रसन्न, आनंदी करणारा होता. आजारपण विसरून मी चांगलीच ताजीतवानी झाले.

लांबलचक समुद्र किनारा, हिरवीकंच झाडी, नयनरम्य पर्वत; आंबा, काजू, फणस, नारळ, पोफळी सर्वांगावर बाळगत दिमाखात वावरणारा असा सिंधुदुर्ग जिल्हा! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिथं जाण्याचा योग आला.

गेले सहा महिने आजारपणामुळे माझ्या सारख्या डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या फेऱ्‍या चालू होत्या. मला वातावरणात चांगला बदल हवा होता. म्हणून सिंधुदुर्गाची निवड केली. आयत्या वेळी ठरवल्यामुळे कोकण रेल्वेचं आरक्षण मिळालं नाही. मग बाय रोडच जायचं ठरवलं.

आम्ही सहाजण शिवनेरीनं मुंबईहून पुण्याला गेलो. पुण्याला एक दिवस मुक्काम करून दुसऱ्‍या दिवशी सकाळी कारनं आम्ही कणकवलीसाठी निघालो.

वाटेत कळलं, की कोल्हापूरजवळ रास्ता रोको असल्यामुळे त्यामार्गे जाणं योग्य होणार नाही. ड्रायव्हरनं सुचवले, की आपण मलकापूरमार्गे जाऊया, रस्ता चांगला आहे अणि वेळपण वाचेल. मग कराडच्या पुढे मलकापूर रस्त्याला लागलो.

काही तासांतच आम्ही मुंबई-गोवा हाय वेला खारेपाटणला पोहोचलो. खूप आनंद झाला. कारण फोंडा किंवा गगनबावडा घाट टाळता आला.

नव्या मुंबई-गोवा हाय वेवर गाडी सुसाट पळत होती. सकाळी साडेआठला निघून बरोबर चार वाजता कणकवलीला पोहोचलो. वाटेत कामतमध्ये नाश्ता अणि दोन वॉश रूम हॉल्ट घेऊनसुद्धा आम्ही लवकर पोहोचलो.

कणकवलीत पोहोचल्यावर मालवणी जेवणाचा आस्वाद घेणं म्हणजे स्वर्गसुख! घरगुती मालवणी खाणावळीतून आम्ही डबा मागवत होतो.

छान कुरकुरीत तळलेले बांगडे, मांदेली, सुरमई, ओल्या नारळाचा भरपूर वापर केलेले सार अणि भात! सगळे तृप्त होत. भरपूर पाणी असलेली शहाळी मुंबई-पुण्यापेक्षा इथं स्वस्त मिळतात. शहाळ्यांचा मनसोक्त आस्वाद घेता आला.

दोन दिवस आराम केल्यावर आम्ही देवदर्शनाला जायचं ठरवलं. सहाजणांसाठी व्हॅन ठरवली. सकाळी नाश्ता करून आम्ही वेंगुर्ल्याच्या दिशेनं निघालो.

छोटे छोटे गुळगुळीत काळे रस्ते, दुतर्फा नारळ, पोफळी, काजूची झाडं, त्या झाडांच्या गर्दीत दिसणारी उतरत्या छपरांची कौलारू घरं, मधेच दिसणारी हिरवीगार शेतं... सगळा नजारा मन प्रसन्न, आनंदी करणारा होता.

पहिल्यांदा आरवलीच्या प्रसिद्ध वेतोबाचं दर्शन घेतलं. मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त आहे. देव वेतोबा संपूर्ण तळकोकणाचा संकट निवारक आहे. सुरुवातीला ही मूर्ती फणसाच्या लाकडात कोरलेली होती.

आता येथील स्थानिक शिल्पकारानं पंचधातूची मूर्ती केली आहे. मूर्तीच्या एका हातात तलवार, तर दुसऱ्‍या हातात घडा आहे. देव वेतोबाला केळीचा घड अर्पण करतात. मनोकामना पूर्ण झाली की चामड्याच्या चपलांचा जोड अर्पण करतात.

ध्यानीमनी नसताना तिथं मिळालेल्या भोजन प्रसादामुळे आम्ही खूप आनंदून गेलो. सभामंडपात बाजूनं बसायची सोय असते, पण गर्दीमुळे फार वेळ बसता आलं नाही.

या मंदिरासमोरच देवी सातेरीचं तसंच सुंदर मंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथं रंगरंगोटी चालू होती. फक्त दर्शन घेतलं अणि आम्ही लगेच निघालो. इथं जवळच प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचं घर आहे.

पुढे वेंगुर्ला कॅम्पमधील श्री स्वामी समर्थ मंदिर बघायला गेलो. आरवली ते वेंगुर्ला कॅम्प रस्ता छान आहे. निसर्गाची लयलूट असलेला परिसर असल्यानं मन आनंदून जातं.

मंदिराचं फाटक उघडून आत प्रवेश करताच स्वच्छता पाहून खूप छान वाटलं. सुरुवातीला एका छोट्या मंदिरात स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य श्री आनंद नाथ महाराज यांची समाधी आहे. त्यांनी १९०३मध्ये संजीवन समाधी घेतली होती, अशी माहिती मिळाली.

मुख्य मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या आत्म लिंग पादुका आहेत. सकाळी आठ ते दहापर्यंत पादुकांचं दर्शन घेता येतं.

आम्ही दुपारच्यावेळी गेल्यामुळे मंदिरात आमच्याशिवाय कोणी नव्हतं. मग आम्ही स्वामी नाम पाठाचं पठण केलं. एका सुंदर स्वच्छ निसर्गरम्य परिसरातील मंदिराला भेट दिल्यामुळे खूप समाधानी झाले.

कणकवलीला गेल्यानंतर आम्हाला कळलं, की ४ डिसेंबरचा नेव्ही डे यंदा मालवण येथे साजरा होणार आहे. दुसऱ्‍या दिवशी ५ डिसेंबरला आम्ही मालवणला जायचा बेत केला.

दुपारी तीन वाजता निघाल्यावर आधी कणकवलीतील प्रसिद्ध स्वयंभू मंदिर पाहिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मंदिरांप्रमाणेच मोठा सभा मंडप आहे. आत गाभाऱ्‍यात महादेवाची पिंड आहे. शांतपणे दर्शन घेता आलं. बाजूलाच एक छोटं दत्त मंदिर आहे.

कणकवली ते मालवण हा प्रवास नेत्रसुखद होता. एका बाजूला डोंगर, मधे रस्ता अणि दुसऱ्‍या बाजूला दरी! सगळा परिसर हिरवाईनं नटलेला. मालवण समुद्र किनारी कधी पोहोचलो ते कळलंच नाही.

sindhudurg
Offbeat Tour : स्वतःच्या कारने फिरण्याचा भारतातला ऑफबीट ट्रेंड!

समोर अथांग अरबी समुद्र, त्यात मच्छिमारांच्या असंख्य बोटी आणि उजवीकडे साधारण ३६० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला पहिला जलदुर्ग ‘सिंधुदुर्ग’! लांबून का होईना, पण किल्ल्याचं दर्शन झालं.

सगळं दृश्य मनात साठवत जवळच असलेल्या राजकोट इथं नौदल दिनानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घ्यायला गेलो. उजवीकडे एका भव्य वटवृक्षाखाली एक छोटं शिव मंदिर आहे.

नमस्कार करून आम्ही चौथऱ्‍याकडे निघालो. ४३ फूट उंचीचा महाराजांचा भव्य पुतळा पाहून रोमांचित व्हायला झालं. हातात तलवार आणि तेजःपुंज चेहरा पाहून खूप अभिमान वाटला. मनोभावे महाराजांच्या पुढे नतमस्तक झालो.

शिल्पकार जयदीप आपटे यांच्या हातून हे शिल्प घडले आहे. सूर्यास्ताच्या साक्षीने पाहिलेला हा मालवण समुद्र किनारा कायमचा स्मृतीत राहील.

परत निघताना जवळ असलेल्या जयंत साळगावकर यांच्या गणेश मंदिराला भेट दिली. हे छोटे, सुबक, स्वच्छ, अत्यंत देखणे गणेश मंदिर आहे.

सुरुवातीला पायऱ्यांवर दोन बाजूला स्वागतास हत्ती उभे केले आहेत. आत गाभाऱ्यात सुवर्ण गणेश मूर्ती सुवर्ण चौरंगावर विराजमान आहे.

गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी व मूषक आहे. सभामंडपाच्या घुमटावर आतल्या बाजूने आठ गणेश मूर्ती कोरलेल्या आहेत व मध्यभागी अष्टकोनी नक्षी आहे.

दर्शन घेतल्यावर भाविकांचे मन प्रसन्न होते. मालवण भेटीत या मंदिराला अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

कणकवलीला आल्यावर आठवडा पटकन संपला. निघायचा दिवस उजाडला. काजू, मालवणी मसाला, मालवणी खाजा अणि अमसुलांची खरेदी केली.

कोकण रेल्वेच्या मांडावी एक्स्प्रेस गाडीनं आम्ही मुंबईला परत निघालो. आजारपण विसरून मी चांगलीच ताजीतवानी झाले. पुन्हा लवकर भेट द्यायचीच असं मनात ठरवून कोकणाचा निरोप घेतला.

-----------------------

sindhudurg
Tourism News: उकळत्या पाण्याचे झरे आणि सततच्या वाफा.. हे नितांत सुंदर ठिकाण आहे कुठे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com