गोपाळ कुलकर्णी
व्यक्तीला प्रतिमा आणि प्रतिकांच्या आभासी जगात घेऊन जाणारी समाज माध्यमे आता हळहळू मानसिक शोषणाची धारदार टूल्स बनत चालली आहेत. यातूनच काहीजण नैराश्याच्या खाईत ढकलले जातात, तर काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. हे कोठे तरी थांबायला हवे, व्यक्तीच्या आयुष्याचा अल्गोरिदमच लिहू पाहणाऱ्या समाज माध्यमांना विवेकाचा ब्रेक लावण्याची वेळ आली आहे.
कॅरोलिन कोझीओल ही न्यू यॉर्कमधील एक कसलेली जलतरणपटू, शंभर यार्डांची बटरफ्लाय रेस एका मिनिटामध्ये पूर्ण करण्याची क्षमता तिच्यात होती. शालेय शिक्षणामध्ये उत्तम कामगिरी असलेली कॅरोलिन हळूहळू खचत गेली. तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली. पोहण्याचा सराव करत असताना तिला अचानक घेरी येऊ लागली.
डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी तिला भोजनासंबंधीचा गंभीर विकार झाल्याचे निदान केले. आपल्यामध्ये हे बदल नेमके कधी आणि कसे झाले हेच तिला समजेनासे झाले. थोडे थांबून विचार केला तेव्हा तिला समजले, की ज्या सोशल मीडियावर आपण रात्रंदिवस पडिक असतो, त्याचे अल्गोरिदम हेच आपले मारेकरी ठरले आहेत.
कॅरोलिनने या कंपन्यांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात खटला भरला आहे. समाज माध्यमांचे सामाजिक दायित्व निश्चित करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले निर्णायक पाऊल मानले जाते. आता ही कायदेशीर लढाई निर्णायक वळणावर आल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात.
पोप यांचा नैतिकतेचा आग्रह
सध्या जगभरातच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) कायदेशीर बंधन घालण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. एआयचा नैतिक वापर आता धर्मवेत्त्यांच्याही चिंतनाचा भाग बनत चालला आहे. त्यामुळेच असेल कदाचित पण पोप चौदावे लिओ यांनीही याबाबत जाहीर भाष्य केले.
बौद्धिक आणि मानसिक आरोग्यावर एआयचा विपरीत परिणाम होऊ शकतो, ही त्यांनी व्यक्त केलेली भीती अगदीच अनाठायी आहे असे म्हणता येणार नाही. एआयच्या विकासाला उच्च नैतिक कसोटीची फुटपट्टी लावण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे. ज्यांच्या हातात ही सगळी सूत्रे आहेत, त्या बड्या कंपन्या हे करायला धजावतील का? आणि त्यांनी हे असे का म्हणून करावे? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.