

Life and Research in Space
esakal
हर्ष मुथा
मानवानं क्षितिजाच्या पलीकडे पाऊल टाकत अंतराळात केवळ भ्रमंतीच केली नाही, तर तिथं स्वतःचं एक ‘घर’ आणि अद्ययावत प्रयोगशाळाही उभारली. पृथ्वीपासून हजारो किलोमीटर उंचावर सतत फिरणारी ‘स्पेस स्टेशन्स’ म्हणजे केवळ मानवी तंत्रज्ञानाचा चमत्कार नसून, भविष्यातल्या अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं उत्तम उदाहरण असणाऱ्या स्पेस स्टेशन्सविषयी...
स्पेस स्टेशन म्हणजे मानवानं तयार केलेलं मोठं अंतराळयान, जे पृथ्वीभोवतीच्या कक्षेत दीर्घकाळ स्थिरावून अंतराळवीरांना तिथं राहण्याची व काम करण्याची सुविधा देतं. सामान्य अंतराळयानाप्रमाणे केवळ पृथ्वीवरून अंतराळात जाणं-येणं हा या स्पेस स्टेशन्सचा उद्देश नसतो. तिथं दीर्घकाळ वास्तव्य करून संशोधन आणि प्रयोग करता येतात. ते एक निवासस्थान असतं, प्रयोगशाळा असते, नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करण्याचं अंतराळातलं केंद्र असतं. बहुतेक स्पेस स्टेशन्स पृथ्वीच्या निम्नकक्षेत (लो अर्थ ऑरबिट - LEO) असतात. तिथं सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या (मायक्रोग्रॅव्हिटी) स्थितीत संशोधन केलं जातं.