फूडपॉइंट: वैशाली खाडिलकर
बाजरी-मेथी पुरी चाट
वाढप
४ व्यक्तींसाठी
साहित्य
एक कप बाजरी पीठ, १ टेबलस्पून बेसन, अर्धा कप बारीक चिरलेली समुद्र मेथी, प्रत्येकी १ टीस्पून काळे व पांढरे तीळ, अर्धा टीस्पून ठेचलेला ओवा, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १ टीस्पून गोडा मसाला, १ टीस्पून गूळ पावडर, १ टेबलस्पून तेलाचे मोहन, तळण्यासाठी तेल, पाणी गरजेप्रमाणे.
चाटसाठी : एक कप दही, पुदिना-कोथिंबीर चटणी, चिंच-गूळ
चटणी, नायलॉन शेव व बटाटा चिवडा आवडीप्रमाणे, चाट मसाला, कोथिंबीर.
कृती
सर्वप्रथम स्टीलच्या परातीत बाजरी पीठ, बेसन पीठ व इतर जिन्नस घेऊन मिश्रण एकजीव करावे. नंतर तेलाचे मोहन व गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर पीठ मळावे व १० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर लाट्या करून छोट्या पुऱ्या लाटून तेलात तळाव्यात व प्लेटमध्ये पेपर नॅपकीनवर काढाव्यात. आयत्यावेळी सर्व्हिंग प्लेटमध्ये ५ ते ६ पुऱ्या मांडाव्यात. त्यावर चाटचे साहित्य घालून लगेच खावयास द्याव्यात.
***