Melghat Butterfly :मेळघाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या आता १४१ झाली आहे..

मेळघाटात आढळणाऱ्या १३४ फुलपाखरांच्या प्रजातींपैकी ८८ प्रजातींची नोंद या अभ्यासादरम्यान घेण्यात आली.
melghat butterfly
melghat butterfly esakal

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मेळघाटातील फुलपाखरांचा मागोवा घेऊन एकंदर किती प्रजातींची फुलपाखरे आढळतात हे निश्चित करण्यासाठी एक अभ्यासदौरा आयोजिला होता.

मेळघाटात आढळणाऱ्या १३४ फुलपाखरांच्या प्रजातींपैकी ८८ प्रजातींची नोंद या अभ्यासादरम्यान घेण्यात आली.

विशेष म्हणजे मेळघाटातील फुलपाखरांच्या यादीत सात नवीन फुलपाखरांची भर पडली आहे, आणि मेळघाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या आता १४१ झाली आहे.

दीपक जोशी

मानवी मनाला सगळ्यात जास्त भुरळ घालणारा कीटक कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर पटकन आपल्या डोळ्यांसमोर येतात ती फुलपाखरे. बाल्यावस्थेत आपल्याला चिऊ-काऊचा परिचय वेगवेगळ्या बडबड गीतांतून होतो.

पुढे शाळेत कविता शिकताना आपल्याला भुरळ घालतात ती अंगणातील, बगीच्यातील फुलांवर भिरभिरणारी रंगीबेरंगी मनमोहक फुलपाखरं. ही अशी स्वच्छंदी फुलपाखरं हा कवी मंडळींचा आवडता विषय असतो.

माय मराठीत तर अनेक कवींनी या ‘चित्रपतङ्गां’वर अनंत कविता लिहिल्या आहेत. आमच्या अकोल्याचे कवी, माझे मित्र प्रशांत असनारे ह्यांनीसुध्दा फुलपाखरांवर काही सुंदर कविता आहेत.

बालमनाचे विश्व आनंदित करणाऱ्या त्यांच्या एका कवितेत माझ्या ह्या कविमित्राने फुलपाखरू पकडण्याच्या प्रयत्नात थकून, रागावून बसलेल्या एका लहानग्याचं वर्णन केलं आहे. फुलपाखरू हाताला लागत नाही म्हणून हा मुलगा गाल फुगवून बसतो आणि कवी म्हणतात –

अगदी तेव्हाच

तो फुलपाखरू भिरभिरत येते

अन् हळूच बसते

त्याच्या फुगलेल्या गालावर

एक गुलाबी फूल समजून

हे फुलपाखरू पुराण सांगण्याचा उद्देश म्हणजे मी नुकताच केलेला मेळघाटातील फुलपाखरांचा चार दिवसांचा अभ्यास दौरा. राज्याच्या वनविभागाने हा दौरा आयोजिला होता.

तसा मी मुळात पक्षीवेडा निसर्गप्रेमी. त्यामुळे फुलपाखरांचे, पतंगांचे, किटकांचे, सरीसृपांचे मला आकर्षण वाटतच असते.

ह्या अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने मला मेळघाटातील जंगलात मुक्काम करण्याचे भाग्य लाभले हे मी माझे संचितच समजतो. कारण जंगलातील हे क्षण आपल्या आयुष्यात येणे हे तसे फार दुर्मिळ, नाही का?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने मेळघाटातील फुलपाखरांचा मागोवा घेऊन एकंदर किती प्रजातींची फुलपाखरे आढळतात हे निश्चित करण्यासाठी हा अभ्यासदौरा आयोजिला होता.

पहिल्यांदाच असा काही दौरा होत होता. या अभ्यासदौऱ्यात विविध ठिकाणाहून आलेल्या २५ निसर्गप्रेमींसह वनविभागाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. मेळघाटात आढळणाऱ्या १३४ फुलपाखरांच्या प्रजातींपैकी ८८ प्रजातींची नोंद या अभ्यासात घेण्यात आली.

विशेष म्हणजे मेळघाटातील फुलपाखरांच्या यादीत सात नवीन फुलपाखरांची भर पडली आहे, आणि मेळघाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या आता १४१ झाली आहे.

melghat butterfly
Melghat Tiger Project : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

पहिल्याच दिवशी सर्व सहभागी निसर्गप्रेमींना अकोट वन्य जीव‌विभागाचा भाग असणाऱ्या जंगलातील विविध संरक्षण कुटींवर नेण्यात आले. एका कुटीवर एक अभ्यासक आणि सोबतीला तेथील‌ एक वनरक्षक.

वनकुटीतील हे वास्तव्य म्हणजे वन्यप्रेमींसाठी आनंदाची लॉटरीच होती. जंगलातली ती थंडी, संध्याकाळ झाल्यावर आसमंत भरून टाकणारे किड्यांचे आवाज, झुंडीने कर्कश्श आवाज करीत नभात सैरावैरा पळणारे पोपटांचे थवे,

काऽऽपु काऽऽपु अशी नवागताला भयचकित करून सोडणारी रातव्याची साद, मधूनच मोरांच्या, रानकोंबड्यांच्या आरोळ्या, चितळांची धावाधाव, सांबरांचे पाय आपटण्याचे ध्वनी,

घुबडांचे चित्कार, केकाटत जाणारी टिटवी अशा सगळ्या रोमांचक वातावरणात मनाला एक नवी उभारी मिळते. वनातील ही गुढरम्यता अनुभवायची म्हणजे एक आगळीवेगळी आनंदाची मेजवानीच होय.

सकाळी लवकर उठून चुलीवर केलेल्या काळ्या चहाचा आस्वाद घेऊन कॅमेरा, दुर्बीण गळ्यात अडकवून वनरक्षकासोबत आमची भटकंती सुरू व्हायची. स्वजवाबदारीवर आम्ही सहभागी झालो आहोत, अशी लेखी संमती देऊन ही भटकंती होत होती.

सोबतच्या वनरक्षकाजवळ एक घुंगरू लावलेली काठी असायची. ती आपटत भ्रमंती सुरू व्हायची. जंगलातील त्या निरव‌ शांततेत दिवसा उजेडीही मनावर एका अनामिक भीतीचे सावट घोंघावत असते.

समोरून वाघ, बिबट, अस्वल असे एखादे श्वापद आले तर काय? पण आवडता छंद, एका फेरीत नऊ-दहा किलोमीटर जंगलात पायी भटकायची तयारी, निर्भय आणि निर्मळ मन असले की तुम्ही जंगल भटकंतीचा आनंद मनमुराद अनुभवू शकता असे मला वाटते.

melghat butterfly
Melghat Bird Survey : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या पक्षीगणनेमध्ये 210 प्रजातींची नोंद!

या भटकंतीत तांबट, टकाचोर, नाचण, नर्तक, सातभाई, बुलबुल, भारद्वाज, हुदहुद, भांगपाडी मैना, शिंपी, कोतवाल, ठिपकेवाला होल्या, तुरेवाले घुबड, वेडे राघू असे पक्षीगणही आम्ही सोबतीला आहोत, ह्याची जाणीव करून द्यायचे.

पक्ष्यांप्रमाणे काही जातीची फुलपाखरेही सकाळी जंगलातील बहुविध जातीच्या फुलांशी लगट करत असतात, काही फुलपाखरे तर इतक्या लगबगीत असतात की त्यांना स्थैर्य या कल्पनेशीच काही देणेघेणे नसते. ती सतत सैरावैरा बागडत असतात.

पक्ष्यांपेक्षा फुलपाखरांना कॅमऱ्यात टिपणे खूप अवघड जाते. सकाळी सात वाजता सुरू झालेली आमची भटकंती साडेअकरा -बारापर्यंत चालायची.

मग पोटपूजेसाठी कुटीकडे आम्ही मार्गस्थ व्हायचो. माझा सोबती होता वनरक्षक सुनील मावसकर, मेळघाटवासी कोरकू. आपल्याला फुलपाखरांचा शोध घ्यायचा म्हटल्यावर अगदी उत्साहाने फुलपाखरं शोधायचा.

दुपारी ४ वाजता आमची दुपारची भटकंती सुरू व्हायची आणि संध्याकाळी साडेपाच, सहापर्यंत आम्ही परतायचो. दुपारची फेरी अंधार पडायच्या आत संपवायची, असे सगळ्यांना बजावण्यात आले होते.

कारण ही वेळ अस्वल, वाघांची भटकण्याची असते. त्यांच्याशी आमनेसामने येण्याचा प्रसंग टाळा, अशा सूचना सगळ्यांनाच दिलेल्या होत्या.

जंगलातील वातावरण सध्या‌ शुष्क असल्यामुळे मातीच्या पाऊलवाटांवर आम्हाला वन्यप्राण्यांचे ठसे सतत दिसायचे. ते पाहून सुनील सांगायचा, “सर अभी थोडी देर पहले ही भालू अपने आगे निकला है। ये देखो ये टायगरके ताजे पगमार्क है।

भालू की बानाइच (म्हणजे कोरकू भाषेत विष्ठा), वाघाची विष्ठा...” ते ऐकून असे वाटायचे आता जर समोरून किंवा मागून वाघ किंवा अस्वल आले तर आपण काय करणार? मग लगेच मनात यायचं, की जे काही करायचं ते तोच करेल आपण काहीही करू शकणार नाही.

पण लगेच सुनील मला फुलपाखरे दाखवायचा ती न्याहाळण्यात, त्यांची छायाचित्रे घेण्यात मी दंग होऊन जायचो. मग कुटीवर आल्यावर सापडलेल्या फुलपाखरांची ओळख करून घेण्यात वेळ निघून जायचा.

जसजशी अंधाराची चादर जंगलाला आपल्या कवेत घ्यायची तसा थंडीचा कडाका वाढायचा मग कुटीच्या आवारात शेकोटी करून आम्ही मध्यरात्र होईतो गप्पा मारत बसायचो.

melghat butterfly
Butterfly Park : देशातील ही सर्वोत्कृष्ट फुलपाखरू उद्याने पाहिलीत का ?

माझ्या कॅम्पचे नाव होते पाचनिंबु कॅम्प. तेथून नऊ किलोमीटरवर चुनखडीचा कॅम्प होता. ह्या कुटीवर मूळचा संभाजीनगरचा पण नोकरीनिमित्त सध्या राजस्थानातील कोट्याजवळच्या एक जिल्हा परिषदेच्या शाळेत फिजिक्स शिकवणारा दीपक जाधव हा निसर्गप्रेमी होता.

त्याचा फुलपाखरांचा अभ्यास दांडगा. त्याला मात्र पहिल्याच दिवशी वाघोबांनी अगदी ३०० फुटांवरून दर्शन दिले होते त्यामुळे तो खूप खूश होता.

‘आम्ही वाघ पाहण्याऐवजी वाघानेच आम्हाला पाहिले,’ असं म्हणत त्यानं तो प्रसंग सांगितला होता. आमची चांगलीच मैत्री जमली होती.‌

मेळघाटातील फुलपाखरांवर अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी अभ्यास करून १३४ फुलपाखरांची नोंद घेतली आहे. त्यांनी ‘मेळघाटातील फुलपाखरांचे संशोधन’ हा विषय घेऊनच आचार्य ही पदवी मिळविली आहे हे विशेष.

डॉ.वडतकरांना मेळघाटात सापडणाऱ्या फुलपाखरांचे मराठी नामकरण करताना डॉ. विलास बर्डेकरांचे मार्गदर्शन लाभले होते.

आता मेळघाटात एकूण १४१ फुलपाखरांची नोंद झाली आहे. ह्या अभ्यासात आम्हाला कोनेरी किरण (Acute Sunbeam), चमक निलांबरी (Metallic Cerulean), मोठा तडतड्या(Large Branded Swift), पट्ट तरंग (Short Banded Sailor), फिक्कट छाया (Pale-brand Bush brown), विशाल तडतड्या (Great Swift), कंपित शर (Wax Dart) अशा सात नवीन प्रजाती आढळून आल्या.

माझ्यासह अभ्यासक रोहित टेकोडे, व्योम चौधरी, सफल पाटील व इंदाराम नागेश्वरराव ह्यांनी ह्या नोंदी घेतल्या.

फुलपाखरांचे विश्व हे खरंच मानवाला अचंबित करणारे आहे. फुलपाखरांविषयी क्रिस्टन डी’अॅन्जेलो (Kristen D’Angelo) यांचे एक सुरेख उद्धृत माझ्या मित्राने मला पाठवले होते.

लेखाचा शेवट त्याच उद्धृताने करतो – फुलपाखरं म्हणजे काय सांगताना डी’अॅन्जेलो म्हणतात Butterflies are God's confetti, thrown upon the earth in celebration of his love!

--------------

melghat butterfly
Butterflies : पेंचमध्ये विविधरंगी १७० फुलपाखरांच्या प्रजाती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com