नितीन दिवाकर मिरजकर
श्रद्धा असेल तर मनाची तयारी होते आणि मग शरीरसुद्धा त्याप्रमाणे साथ देतं. प्रचंड दमछाक होत असूनसुद्धा शिखरावर पोहोचल्यानंतर दत्तगुरूंच्या पादुकांचं आणि दत्तत्रिमूर्तींचं दर्शन घडल्यावर आपल्या श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मला निसर्गसौंदर्याची, ट्रेकिंगची आवड, तर आमच्या ‘सौं’ना देवदर्शनाची. त्यामुळे आम्ही दोघे फिरायला जाण्यासाठी अशा स्थळांची निवड करतो, जिथे दोघांचेही हेतू साध्य होतील. गतवर्षी आम्ही चारधाम यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आणि यावर्षी द्वारका, सोमनाथ आणि गिरनारला जायचं ठरवलं.
जिथे राहण्याची सोय आणि प्रवासाची साधनं सहजासहजी उपलब्ध होत असतात, तिथे जाताना आम्ही शक्यतो टूर ऑपरेटरची मदत घेणं टाळतो. पैशांची बचत होते आणि आवडलेल्या ठिकाणी हवा तेवढा वेळही देऊ शकतो.