

Sustainability and Indian Culture
esakal
ॲड. शालिनी दीपक शर्मा
भारतात ‘शाश्वतता’ हा शब्द आधुनिक वाटत असला, तरी सातत्य, संयम, परस्परावलंबन आणि जबाबदारी या संकल्पना आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून रुजलेल्या आहेत. बदलत्या जगात शाश्वततेच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात. एखाद्या कुटुंबासाठी अन्न वाया जाणार नाही अशा पद्धतीनं स्वयंपाकाचं नियोजन करणं महत्त्वाचं असू शकतं; तर मोठा समारंभ आयोजित करणाऱ्या दुसऱ्या कुटुंबासाठी पुन्हा वापरता येतील अशा वस्तूंची व्यवस्था करणं योग्य ठरू शकतं.
काही महत्त्वपूर्ण विचार मनात आपल्याही नकळत रुजत जातात. आपण एखाद्या नव्या विचाराची सुरुवात करत आहोत, याची जाणीवही आपल्याला होत नाही. मी पर्यटक म्हणून भ्रमंती करत असताना माझ्या मनात असाच एक विचार रुजला. मी एकदा एका जुन्या ऐतिहासिक राजवाड्यात फिरत होते. त्या वास्तूनं अनेक पिढ्या पाहिल्या होत्या हे पाहताक्षणीच समजत होतं. संगमरवरावरचं कोरीवकाम आजही स्पष्ट दिसत होतं. एका वेगळ्या कालखंडातल्या वस्तू अगदी व्यवस्थित जतन करून ठेवल्या होत्या. तिथल्या एका जुन्या दरवाजाच्या पलीकडे हिरवाईनं नटलेलं नयनरम्य दृश्य अनपेक्षितपणे नजरेस पडत होतं, जणू इतिहास आणि निसर्गाचा मेळच. इतर ऐतिहासिक ठिकाणी नेहमी दिसणाऱ्या पाट्याही तिथंही नजरेस पडत होत्या - ‘परिसर स्वच्छ ठेवा’, ‘कचरा कचरापेटीतच टाका’. ‘रिड्यूस रियुझ रिसायकल’ अशा काही आधुनिक पाट्याही दिसल्या.