

Sustainable Fashion
esakal
सोनिया उपासनी
शाश्वत कपड्यांमुळे वस्त्रकचरा कमी करण्यास मदत होते. आज फास्ट फॅशनमुळे लोक कमी वेळात मोठ्या प्रमाणावर कपडे खरेदी करतात आणि काही कपडे फार कमी वेळा वापरून फेकून देतात. या सवयीमुळे वस्त्रकचरा वाढत आहे. कपड्यांचा पुनर्वापर, दुरुस्ती आणि जुन्या कपड्यांचा नव्या स्वरूपात वापर केल्यास या समस्या कमी होऊ शकतात.
फॅशन ही बदलती जीवनशैली असली, तरी तिचा पर्यावरणावर आणि समाजावर होणारा परिणाम दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे आजच्या काळात फॅशनबरोबरच सस्टेनेबिलिटीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सस्टेनेबल कापडांचा वापर पर्यावरणपूरक आणि जबाबदार फॅशनकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. सेंद्रिय कापूस (ऑरगॅनिक कॉटन), लिनन, भांग, बांबू आणि पुनर्वापर करता येणारे तंतू यांसारख्या पर्यायांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, कपड्यांच्या कचऱ्यात घट करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
कपडे, पादत्राणे, दागिने, पिशव्या आणि विविध प्रकारच्या फॅशन ॲक्सेसरीजमधून व्यक्तीची जीवनशैली, व्यक्तिमत्त्व आणि आवड दिसून येते. मात्र फॅशन उद्योगाचा वाढता विस्तार पर्यावरणावर मोठा परिणाम करत आहे. कापडाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पाण्याचा अतिवापर, रासायनिक रंगांचा वापर, प्लॅस्टिकच्या तंतूंची निर्मिती आणि कपड्यांचा वाढता कचरा यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शाश्वत फॅशनला आणि सस्टेनेबल कापडांच्या वापराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.