डॉ. किरण रणदिवे
ताम्हिणी-मुळशी-डोंगरवाडी म्हटलं, की पश्चिम घाटाच्या शिखरावर वसलेला, निसर्गरम्य धबधबे, तलाव, घनदाट जंगल आणि गर्द हिरवे डोंगर असलेला परिसर आपल्याला विविध सहलींच्या आठवणीत घेऊन जातो.
याच ताम्हिणी-मुळशी-डोंगरवाडीमध्ये आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे काही देवांच्या नावानं राखलेली अनेक जंगलं आहेत. त्यांना देवराई किंवा देवराहटी असंही म्हणतात. या देवराया म्हणजे निसर्गाचा एक संपन्न आविष्कारच.
या देवरायांमधली जैवविविधता निसर्गअभ्यासकांना नेहमीच मोहीत करते. तिथे सापडणाऱ्या जीवाणूंपासून बुरशीपर्यंत सर्वच सजीवांमध्ये दिसणारी विविधता माणसाला पुन्हा एकदा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल विचार करायला भाग पाडते. इथल्या मातीचं परीक्षण केल्यास काही वेगळ्याच बुरशी त्यांचं अस्तित्व दाखवतात.