French Revolution
Esakal
विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा स्वीकार फ्रेंच क्रांतिकारकांनी केला खरा; पण या मूल्यांचा खरा क्रम त्यांना समजलाच नाही. बंधुता हे मूल्य खरेतर प्रथमस्थानी, प्राधान्याने यायला हवे होते. त्याची गफलत होऊन त्यांनी त्याला तिसरे स्थान दिले!
बेंजामिन फ्रँकलिन ट्रुब्लड यांचा स्वाभाविक कलच शांतीकडे होता. सर्व जगाचाच एक देश (मग तो फेडरेशनच्या स्वरूपात का असेना) होऊ शकला, तर मग राजकीय अर्थाने सर्वच राष्ट्रे एका मोठ्या राज्याचे घटक होतील व मग त्यांच्यात कधी काही कारणामुळे संघर्ष उद्भवला, तर त्यामुळे युद्ध करायची वेळ येणार नाही; तो राज्या-राज्यांमधील अंतर्गत संघर्ष समजून चर्चेतून मिटवता येईल, अशी ट्रुब्लडची प्रामाणिक समजूत होती.
ट्रुब्लडची अशी समजूत व असा कल असायचे मुख्य कारण त्याच्या धर्मश्रद्धेत सापडते. तो धर्माने अर्थातच ख्रिश्चन असला, तरी ख्रिस्ती धर्माच्या अंतर्गत क्वॅकर या पंथाचा त्याने स्वीकार केला होता. हा पंथ शांतता, बंधुभाव व सहजीवन यांचा पुरस्कर्ता असून, युद्धाच्या पूर्ण विरोधात होता (व आहेसुद्धा.) त्याचा थोरला भाऊसुद्धा याच पंथाचा असल्यामुळे त्याला हा पंथ संस्कारातूनच मिळाला, असे म्हणायला हरकत नाही.