डॉ. योगेश प्रभुदेसाई
महालक्ष्मीचे आद्यपीठ कोल्हापूर हे शिवक्षेत्र होते. त्याचबरोबर करवीर माहात्म्य या ग्रंथात कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून गौरवले आहे. तेराव्या शतकातच कोल्हापूरला ‘दक्षिण वाराणसी’ म्हटले गेल्याचे यादव कन्नर राजाच्या कोरीव लेखांतून समजते. एकूणच महालक्ष्मीची कीर्ती अनेक शतके टिकलेली आणि वर्धिष्णू असल्याचे दिसते. देवतेविषयीचे भावभक्तीविश्व अबाधित राहिल्याचे जाणवते. येथील सांस्कृतिक आणि सांप्रदायिक परंपरा यांतून ते ठळक होते. ही घट्ट वीण आघात सहन करूनही अबाधित राहते... वारसा जपते...
क्षेत्रे कोल्लापुरादन्ये महालक्ष्मी यदार्च्यते ।
लक्ष्मीवत्सातदाकार्या रूपाभरणभूषिता ।।
- देवतामूर्तीप्रकरण (पंधरावे शतक)
मेवाडच्या महाराणा कुंभाच्या दरबारी असलेल्या सूत्रधार मंडनाने हा महालक्ष्मीविषयक श्लोक आपल्या ग्रंथात उद्धृत केला आहे. अशा पद्धतीने महालक्ष्मी आणि तिच्या ‘कोल्लापूर’ पीठाविषयी विशेष नमूद करून ठेवावे लागावे इतकी या देवतेची सांप्रदायिक परंपरा सर्वत्र पसरलेली होती. काय होती ही परंपरा? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावे लागेल.
इसवी सनाच्या साधारण अकराव्या शतकापासून आपल्याला या देवतेविषयीचे संदर्भ आढळू लागतात. आपण काही महत्त्वाचे संदर्भ पाहूयात. लक्षणीय बाब म्हणजे हे संदर्भ खुद्द कोल्हापूरमधील नसून, कर्नाटक आणि गोव्यामधील आहेत. कर्नाटकातील संदर्भांचा विचार करता, दोन कोरीव लेख विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत. एक इ.स. १०४९मधला, तर दुसरा इ.स. १०६३-६४मधला. दोन्ही कोरीव लेखांची मंगलाचरणे महालक्ष्मीच्या आणि तिच्या आद्यपीठाच्या स्तुतीपर आहेत. त्या मंगलाचरणांचा आशय असा, ‘जिच्या अस्तित्वाने अनंत असा अंधःकार दूर झाला, जिचा अवतार अठ्ठावीस युगे आहे, जी जंबुद्वीपातील शिवक्षेत्रात (कोल्हापूर) वास करून असते, जी चौसष्ट योगिनी आणि सिद्धांच्या मेळाव्याने घेरलेली आहे, जिची आराधना ब्रह्माने केली, जी श्री कोल्लापूरपीठाची अधिष्ठाती आहे, अशी ती महालक्ष्मी’.हा लेख कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा मागोवा घेतो. ‘दक्षिण काशी’ म्हणून कोल्हापूरचे महत्त्व आणि महालक्ष्मी देवीच्या प्राचीनतेचे पुरावे दाखवून तिचा प्रभाव कसा सर्वदूर पसरला होता, हे स्पष्ट करतो.