

How to Build Brand Trust Marathi
esakal
जाहिरातींमधून ब्रँडचा परिचय होऊ शकतो, नाव कानावर पडू शकतं; पण केवळ तेवढंच म्हणजे ब्रँडिंग नाही. नुसत्या जाहिरातींनी प्रतिमा निर्माण होऊ शकते, पण त्याला प्रत्यक्ष प्रयत्नांची जोड नसेल, तर तो नुसता फुगा होतो, ब्रँड नव्हे! लोकांच्या मनातला तुमच्या ब्रँडबद्दलचा विश्वास हाच तुमचा सर्वात ताकदवान ‘ब्रँड ॲम्बॅसिडर’ असतो. जाहिरातीत ओळखीच्या स्टार्सचे चेहरे लक्ष जरूर वेधून घेतात, पण विश्वास दृढ करण्यासारखं काम असेल तरच ब्रँड मोठा होतो.
ब्रँड म्हणजे काय? तुमचं नाव उच्चारल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनात जे काही येतं, तोच तुमचा ब्रँड. नुसतं नाव म्हणजे ब्रँड नाही, नुसता लोगो नाही, किंवा तुमची टॅगलाइनही नाही. माझ्या मते ब्रँड म्हणजे तुमची ओळख. लोकांच्या मनातली तुमची प्रतिमा. आज लग्न म्हटल्यावर ‘अनुरूप- इथे लग्न जमते’ हे डोक्यात येतं, ही झाली ब्रँड-ओळख. अर्थातच इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार रंजक होता.
माझी आजी अंजलि कानिटकर. तिनं १९७५मध्ये पुण्यात अनुरूपची सुरुवात केली तेव्हा त्याचं स्वरूप अगदी साधं आणि घरगुती होतं. तेव्हा कुठलं आलंय ‘ब्रँडिंग’ वगैरे! पण तिची कामावरची निष्ठा, अनुरूपमध्ये नोंदवलेली सगळी स्थळं तिला अक्षरशः पाठ असणं आणि त्यांना अनुरूप जोडीदार सुचवण्याची तिची विलक्षण हातोटी यानं ‘ब्रँड’चा पाया घातला गेला. आणि बघता बघता ज्यांची अनुरूपमधून लग्न जमली आहेत अशा हजारो ‘ब्रँड ॲम्बॅसिडर्स’ची फौजच तयार झाली. अनुरूपचं नाव होऊ लागलं आणि काही काळात, ९०च्या दशकात अनुरूप पत्रिका हे मासिक सुरू झालं. पोस्टानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनुरूपचा ‘ब्रँड’ मिरवणारी मासिकं पोहोचू लागली.