

How Volcanic Traps Shaped Maharashtra’s Landforms Climate Minerals and Agriculture
esakal
दख्खनचे पठार हे केवळ भौगोलिक वैशिष्ट्य नसून, भारतासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. आजही लाखो लोकांच्या जीवनावर दख्खन पठाराचा प्रभाव आहे. हा प्रांत महाराष्ट्राच्या भूवैज्ञानिक रचनेचा मुख्य घटक असून, तो हवामान, नद्या, शेती, खनिज संपत्ती आणि भूप्रदेश यांवरही मोठा प्रभाव टाकतो.
महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यांची चर्चा करताना दख्खनचे पठार विसरून चालतच नाही. हे पठार म्हणजेच डेक्कन प्लाटो हे भारतीय उपखंडातील एक विशाल आणि एक अत्यंत महत्त्वाचे भौगोलिक व भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या याला ‘डेक्कन ट्रॅप्स’ किंवा ‘डेक्कन ज्वालामुखी प्रांत’ असे म्हटले जाते. ‘ट्रॅप’ हा शब्द स्वीडिश भाषेतील ‘trapp’ (पायऱ्या) या शब्दापासून आला आहे. या प्रदेशातील पायऱ्यांसारख्या भूप्रदेशामुळे हे नाव मिळाले. शिवाय ‘डेक्कन’ हा शब्द संस्कृतमधील ‘दक्षिण’ या शब्दावरून आलेला आहे. या प्रदेशाने महाराष्ट्राला विशिष्ट भूआकाराबरोबरच खनिज संपत्ती, जीवाश्म दिले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण हवामान आणि ऋतूंसाठी या पठाराने मोठी भूमिका बजावली आहे. दख्खनचे पठार हे जगातील सर्वात विस्तीर्ण खंडीय फ्लड बेसॉल्ट प्रदेशांपैकी एक आहे, आणि मोठ्या प्रमाणातील ज्वालामुखी प्रक्रियेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचे उदाहरण मानले जाते.
सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी घडलेल्या प्रचंड ज्वालामुखी उद्रेकांमुळे पश्चिम घाट निर्माण झाला. वैज्ञानिकांच्या मते हे उद्रेक तुलनेने कमी कालावधीत (सुमारे ३० हजार वर्षांपेक्षा कमी) झाले. दख्खनचे पठार जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक आहे. पण हा केवळ ज्वालामुखी खडक नाही, तर तो पृथ्वीवरील मोठ्या प्रमाणातील भूगर्भीय प्रक्रियांचा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. खंड विभाजन, मॅन्टल डायनॅमिक्स आणि टप्प्याटप्प्याने झालेल्या ज्वालामुखी क्रियेचा इतिहास समजून घेण्यासाठी त्याचे महत्त्व फार मोठे आहे.