Sahyadri Mountains
Esakal
शंतनू परांजपे
सह्याद्रीच्या मातीच्या रंगांची विविधता ही या प्रदेशाच्या पर्यावरणीय समृद्धीचा पुरावा आहे. ही माती कृषी, वनस्पती विविधता आणि जलस्रोतांसाठीचा भक्कम आधार आहे. मात्र, पाऊस, वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे या मातीची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे.
सह्याद्री नामा नग हा प्रचंड
दक्षिणदिशेचा अभिमानदंड ।
हाती झळके परशु जयाच्या..
स्कंधावरी दुर्गम दुर्ग तयाच्या...
स ह्याद्रीकार जोगळेकरांनी सह्याद्री पर्वताचे असे यथासांग वर्णन केले आहे. दुर्गम दुर्ग अंगाखांद्यावर घेऊन वावरणाऱ्या या सह्याद्रीमध्ये अनेक गुपिते दडलेली आहेत. ही गुपिते कधी जैवविविधतेच्या रूपाने आपल्या समोर येतात, कधी वेगवेगळ्या कातळशिल्पांमुळे, तर कधी विविधरंगी मातीमुळे..!
सामान्यतः पश्चिम घाट म्हणूनही ओळखली जाणारी सह्याद्री पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक प्रमुख पर्वतरांग आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यांमधून पसरलेली ही रांग भारताच्या जैवविविधतेचे एक प्रमुख केंद्र आहे; तर येथील माती या प्रदेशाच्या पर्यावरण, कृषी आणि भूगर्भीय इतिहासाची साक्ष आहे.
कोणत्याही ठिकाणच्या मातीचे रंग तिच्या रासायनिक रचना, खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवामानावर अवलंबून असतात. सह्याद्रीमध्ये लाल, काळी, तपकिरी, पिवळी आणि अशा विविध रंगांनी नटलेली माती आढळते. ती विविध प्रकारच्या वनस्पती, कृषी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण सह्याद्रीमधील अशाच विविधरंगी मातीचा आढावा घेऊ या..!