

history of indian home decor
esakal
युद्ध परिस्थिती जसजशी आटोक्यात येऊ लागली, तसतशी भारतीय लोकांच्या जीवनशैलीत आधुनिकता येऊ लागली. पारंपरिक विचारांमध्ये नवनवीन कल्पनांची भर पडू लागली, आणि भारतीय कुटुंबांनी पहिल्यांदाच ‘बदल’ स्वीकारायला सुरुवात केली. पुढे विसाव्या दशकात तर घराला एक मॉडर्न टच मिळाला. गृहसजावट ही केवळ उपभोगाची गोष्ट न राहता ती एक स्टेटस सिम्बॉल म्हणून ओळखली जाऊ लागली.
इवलीशी चिऊताई काड्या, गवत गोळा करत आपलं घरटं तयार करते, तर सुगरण एखाद्या लटकत्या शिल्पाप्रमाणे रचना असलेला आपला खोपा तयार करते. सुंदर आवाजाची कोकिळा मात्र फारच आळशी; ती कावळ्याच्या घरातच आपली अंडी घालते. शिंपी पक्षी आपल्या नावाला शोभेल असं तंतूंनी दोन पानांना पिशवीसारखं घरटं चक्क शिवतो. सुतार पक्षी आपल्या चोचीनं झाडाची फांदी पोखरून तिथं आपला निवारा वसवतो, तर साळुंकी कुठल्यातरी छताचा आधार घेत चिखलामातीनं आपलं घरटं बनवते. तसं पाहायला गेलं तर सर्वच पक्षी आपल्या संरक्षणासाठी व आपल्या गरजेनुसार आपलं छोटसं का होईना एखादं घरटं तयार करतात. त्याचप्रमाणे एकेकाळी गुहेत राहणारा मनुष्य प्रगतिपथावर येता येता स्वतःच घर उभारू लागला आणि यातूनच समाजनिर्मिती झाली. इतर सजीवांप्रमाणेच माणसाचंही आपल्या घरट्यावर म्हणजे आपल्या घरावर नितांत प्रेम. या पृथ्वीतलावर आपल्या हक्काचं एक छत आणि चार तरी भिंती असाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. पण आता अन्न, वस्त्र, निवारा यांपैकी निवारा ही गरज फक्त मूलभूत गरज राहिली नसून, हा निवारा अधिकाधिक सुखसोयींनी युक्त व आकर्षक कसा असेल याकडे त्याचा जास्त कल आहे.