अवित बगळे
समुद्रात प्लॅस्टिकचा कचरा सापडणे ही बाब आज नवीन राहिलेली नाही. मात्र या प्लॅस्टिकचे अतिसूक्ष्म तुकडे मत्स्यजीवांच्या माध्यमातून आपल्या आहारात आणि तिथून आपल्या शरीरात पोहोचत आहेत. यामुळे पचनसंस्था, प्रजनन क्षमता आणि इतर शारीरिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे अतिसूक्ष्म प्लॅस्टिक कण आज ‘सूक्ष्म’ वाटत असले, तरी त्यांचा परिणाम फार ‘मोठा’ आहे.
गोवा माहीत नाही असा एखादाच कोणी असेल. जगाच्या पर्यटन नकाशावर वरचे स्थान पटकावलेल्या गोव्यात येण्यासाठी जगभरातील पर्यटकांचा आकर्षणबिंदू असतो येथील निळाशार समुद्र आणि मऊ, मुलायम वायू. गोव्याचा निळ्याशार समुद्र जणू पर्यटकांसाठी नंदनवनच. देशभरातून, अगदी जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात, राहतात, खातात, मौजमजा करतात आणि निघून जातात. मागे राहतो तो टनच्या टन प्लॅस्टिकचा कचरा... बाटल्या, पिशव्या, चमचे, स्ट्रॉ, फुगे, थर्माकोलची ताटे.