

Indian Perfume Industry Analysis
esakal
आजकाल नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक लोकांमध्ये वावरावे लागते, प्रवास करावा लागतो. अशावेळी आपल्या शरीराला येणारा घामाचा दर्प घालवणारा सुगंध उत्साहवर्धक असतो. नवी पिढी आपल्या व्यक्तिमत्त्वाबाबत अधिक जागरूक आहे, त्यामुळे बाहेर जाताना परफ्यूम, डिओड्रंट, बॉडी स्प्रे अशा सुगंधांचा वापर करण्याबाबत व्यक्ती दक्ष असते.
सुमारे ६० हजार वर्षांची सुगंध अर्थात अत्तरनिर्मितीची परंपरा असणारा आपला देश. अत्तर, परफ्युम इत्यादी विविध प्रकारच्या सुगंधांची जगातील तिसरी मोठी बाजारपेठही आहे. आर्थिक वर्ष २०२४मध्ये ही बाजारपेठ २८.१ कोटी डॉलरची होती, ती आर्थिक वर्ष २०३२पर्यंत वार्षिक १५.२३ टक्के चक्रवाढ दराने (सीएजीआर) ८७.३३ कोटी डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अत्तर हा नैसर्गिक सुगंधाचा प्रकार आहे, तर परफ्युम, डिओड्रंट, बॉडी स्प्रे, रोलऑन किंवा अन्य स्वरूपात येणारे सुगंध हे कृत्रिम प्रकार आहेत. कमी किंमत, सहज उपलब्धता यामुळे या प्रकारांची मागणी वाढत आहे. त्यामुळे परफ्युमच्या बाजरपेठेचा सुगंधही जगभरात दरवळत आहे.