स्मरण । प्रा.मिलिंद जोशी
मी अंतर्नाद मासिकासाठी पुस्तक परीक्षणाचे सदर लिहीत होतो तेव्हाची गोष्ट. एका महिन्यात मी डॉ. जयंत नारळीकर यांच्या चार नगरातील माझे विश्व या पुस्तकावर लिहिले.
डॉ. नारळीकरांचा मला फोन आला. पुस्तकातल्या महत्त्वाच्या भागाकडे तुम्ही लक्ष वेधले आहे, असे म्हणत त्यांनी माझे कौतुक केले. मी महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतही तेव्हा कार्यवाह म्हणून कार्यरत होतो. परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापन दिनाला विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखकाला गो.रा. परांजपे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. डॉ. जयंत नारळीकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठरविले.
पुरस्काराची रक्कम कमी असल्याने याबाबत डॉ. नारळीकर यांच्याशी कसे बोलायचे, असा प्रश्न पडला. मी त्यांना पत्र लिहून याबाबत कळविले. त्यांचे ताबडतोब उत्तर आले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद ही अतिशय जुनी प्रतिष्ठित संस्था आहे. अशा संस्थेचा पुरस्कार स्वीकारताना पुरस्काराची रक्कम किती आहे हा भाग गौण आहे. हा पुरस्कार विज्ञानविषयक लेखनासाठी असल्याने ते जास्त महत्त्वाचे आहे. या पुरस्कारासाठी आपण माझी निवड केली याचा आनंद आहे. मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहे.’ ठरल्याप्रमाणे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर आले.
पुढे एके वर्षी हा पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेविषयी त्यांना आपुलकी वाटत होती. विशेषतः दरवर्षी २८ फेब्रुवारीला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी विज्ञान परिषद संयुक्त विद्यमाने मराठी विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित करतात याचा त्यांना विशेष आनंद वाटत होता.