

Israel Aliyah Policy
esakal
इस्राईलचे ‘ज्यू जोडो’ अभियान नवे नाही. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या ज्ञातीबांधवांच्या पाठीशी ताकद उभी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी इस्राईल सरकार मोठी राजकीय आणि आर्थिक गुंतवणूक करते आहे. आता ज्यूंच्या संस्कृतीची हीच प्राचीन पाळेमुळे थेट ईशान्य भारतापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.
धर्म, भाषा आणि वंश या तिन्ही घटकांनी जगाचा इतिहास आणि भूगोल यांना वेळोवेळी कलाटणी दिली. याआधारावर अनेक देशांची विभाजने होऊन नव्या राष्ट्रांचा उदय झाला. काही देशांच्या सीमा विस्तारल्या, तर काहींच्या आक्रसल्या. नैतिक मानवी मूल्यांची कसोटी लावायची झाली, तर या तिन्ही गोष्टी मिथ्या आहेत. एखाद्या देशाच्या सांस्कृतिक उभारणीला हे तिन्ही घटक पोषणमूल्ये पुरवीत असले तरीसुद्धा त्यामुळे अंतिमतः समस्यांची निर्मिती होत असल्याचे दिसून येते. म्हणूनच जाणत्याजनांनी या तिन्ही घटकांपासून जनतेला दोन हात दूर राहण्याचाच सल्ला दिला होता, पण स्वार्थी राजकारणाने हा निखारा पेटता ठेवला अन् जगभरातील शांततेला त्यामुळे नजर लागली. वंशद्वेषाच्या टोकदार सुईवर उभ्या राहिलेल्या हिटलरच्या कथित शुद्ध आर्यवंशीय राजवटीने कधीकाळी ज्यूंना गॅस चेंबरमध्ये लोटले होते. धर्माच्या आधारावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांतील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचार लपून राहिलेले नाहीत. वंशद्वेषामुळे नेमके काय होते, याचा भूतकाळ अनुभवलेल्या आणि वर्तमानात शोषकाच्या भूमिकेत गेलेल्या इस्राईलने जगभरातील ज्यूंशी संधान साधायला सुरुवात केली आहे. त्याचे कनेक्शन आता थेट ईशान्य भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे.