

IT Index Crash
esakal
सन २०२३सारखी तेजी नाही. तेव्हा कुठलाही शेअर घेतला तर तो वाढत होता. आता विचारपूर्वक खरेदी करावी लागेल. स्मॉल व मिड कॅप शेअरचा नफा वाढत आहे, तिथेच संधी आहे. त्यात भरीस भर म्हणजे रिझर्व्ह बँकेने फ्युचर्स बाजाराच्या मार्जिन नियमांमध्ये बरेच बदल केले आहेत आणि तेही अत्यंत कडक केले आहेत.
सीआयडी मालिकेतील प्रसिद्ध पात्र एसीपी प्रद्युम्न सर्वांच्या परिचयाचे आहे. कुठल्याही गुन्ह्याचा शोध लावताना त्यांना काहीतरी शंका येते, आणि तिचा पाठपुरावा करताना ते म्हणतात, ‘‘दया, कुछ तो गडबड है!’’ नेमकी तशीच शंका आता आम्हाला येत आहे. बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेला अमेरिकेबरोबरचा द्विपक्षीय करार आता होऊ घातला आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव होऊनही दीर्घकाळ दिल्लीच्या तख्तावर त्यांचाच कब्जा होता, तसेच या करारात आपल्याला नक्की काय मिळाले, आपण जिंकलो की हरलो ते कळत नाही, पण त्याचा पुढे फायदाच होईल. त्याआधी युरोपियन युनियन व युनायटेड किंग्डम यांच्याबरोबरच्या करारांचेही सूप वाजले आहे. आतातरी परदेशी संस्था भारतीय शेअर बाजारात पुन्हा खरेदी सुरू करतील, ही आशा फोल ठरते की काय, अशी शंका येण्यास भरपूर जागा आहे. नेमके काय होत आहे? तशी खरेदी सुरूच आहे, पण पूर्वीसारखा जोर नाही. ता. ९ ते १३ फेब्रुवारी या सप्ताहात निर्देशांक वर जायच्या ऐवजी चक्क खाली आला. सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस दुडूदुडू धावत वर निघालेली निफ्टी २६००९ अंशाचा टॉप करून तेथून पुढील दोन दिवसांत ५३८ अंश आणि सप्ताहाच्या सुरुवातीपासून ४१७ अंश खाली येते, हे काही पचनी पडत नाही. आणि म्हणावेसे वाटते, ‘ये कुछ हजम नाही हुआ, दया, कुछ तो गडबड है!’’