श्रीनिवास शारंगपाणी
चारचाकी गाडीचा विकास अनेक दिव्यांतून जातो. सर्वसाधारणपणे पूर्ण प्रक्रियेस अडीच ते तीन वर्षं लागतात. कायदे, नियम यांच्यात बदल होऊन मोठे अडथळे आल्यास यापेक्षाही अधिक वेळ लागू शकतो. जेवढा विलंब जास्त तेवढं नुकसान अधिक. त्यामुळे कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी खूप आधीपासूनच भविष्यात येऊ घातलेले नियम, बाजाराची पुढील अनेक वर्षांमधील अवस्था यांचा बारकाईनं अभ्यास करावा लागतो.
कुठल्याही कारचं उत्पादन हे जसं आव्हानात्मक आणि रंजक आहे, त्याइतकंच उत्पादन होण्यापूर्वी कार कशी विकसित केली जाते हे जाणून घेणंसुद्धा रंजक आणि आव्हानात्मक आहे. कारच्या कारखान्यात एक चक्कर मारली, तर तिचं उत्पादन कसं होतं, म्हणजे कारच्या बॉडीचे भाग कसे प्रेस केले जातात, वेल्डिंग प्रक्रियेनं त्यांची जोडणी कशी केली जाते, नंतर रंगकाम कसं होतं, इंजिन आणि ट्रान्समिशन (गिअरबॉक्स, अॅक्सल इत्यादी) यांचं वेगळ्या ठिकाणी उत्पादन होऊन असेंब्ली विभागात ते बॉडीशी कसे जोडले जातात (इंजिन ड्रॉप), तसंच त्याच असेंब्ली लाइनवर चाकं, सीट्स, डॅशबोर्ड, दिवे आणि इतर गोष्टींची जोडणी होऊन पूर्ण कार कशी तयार केली जाते हे पाहता येतं. पण कारखान्यातल्या फेरीत पाहता येत नाही, तो चारचाकीचा कल्पनेपासून उत्पादनापर्यंत होणारा प्रवास.
कारच्या जन्माची प्रक्रिया बहुतांश कंपन्या गुप्तच ठेवतात. त्याचं कारण म्हणजे या क्षेत्रात असलेली तीव्र स्पर्धा. अन्यथा सर्व कंपन्यांची प्रक्रिया कमी-अधिक फरकानं सारखीच असते. गमतीची गोष्ट अशी, की बहुतेक सर्व उपभोग्य वस्तूंची नवनिर्मिती अशाच प्रक्रियेनं होत असते. या प्रक्रियेचं नाव आहे नवोत्पादन विकास (New Product Development - NPD). या पद्धतीत विशेषतः नव्या कारचा विकास करताना कोणता क्रम अंगीकारला जातो ते पाहू या. सर्व पायऱ्यांवर गटांमध्ये चर्चा करून निष्कर्ष पक्के केले जातात आणि पुढील क्रम गाठण्यासाठी जबाबदार व्यक्तींची स्वाक्षरी आवश्यक असते. गटामध्ये विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ तंत्रज्ञ उपस्थित असतात.