colors of life
Esakal
अमृता देसर्डा
मनाच्या काठावर एक तरलता आपल्या सोबत असते, त्यात असतो एक शांत रंग. कधी तो रंग फिकट होतो, तर कधी गडद. आपल्या मनाच्या स्थितीवर तो रंग अवलंबून असतो. आपल्या आजूबाजूला जे रंग आपली सोबत करत असतात, त्यावरून आपण जो अर्थ काढतो, त्या रंगाचा स्वभाव आपण घेत असतो. रंगांची ही अफाट दुनिया मानवी जगण्याच्या अस्तित्वाला एक आकार-उकार देत असते. त्यातून आपली एक रंगमयी बोलकी अशी दुनिया निर्माण होत असते.
लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो, ‘टिपी टिपी टीप टॉप’ नावाचा. त्यात आम्ही मैत्रिणींना विचारायचो, ‘टिपी टिपी टीप टॉप, व्हॉट कलर यू हॅव, माझा रंग सांगू का?’ मग मैत्रिणी म्हणायच्या, ‘सांग सांग’. मग ज्यावर राज्य असेल तो रंग सांगणार. आणि तो रंग असेल अशा आसपासच्या वस्तूला जो सर्वात आधी स्पर्श करेल तो जिंकला. जो सगळ्यात उशिरा स्पर्श करेल तो हरला. या खेळात आम्ही आजूबाजूचे खूप रंग शोधून काढायचो, जे सहजासहजी सापडणार नाहीत, समजणार नाहीत असेही.
रंग पटकन शोधण्यात खूप चॅलेंज वाटायचं. खूप मज्जा यायची. आकाशाचा रंग, मातीचा रंग, फुलांचा रंग, झाडांचा रंग, पानांच्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा. किती रंग आम्ही शोधत राहायचो. आता हा खेळ हल्ली मी माझ्या मुलीबरोबर, झिराबरोबर खेळते. तिलाही हा खेळ आवडला आहे. तिच्याबरोबर खेळताना मला तेव्हाचे दिवस आठवतात, कारण आम्ही लहानपणी खूपदा हा खेळ खेळायचो. झिराबरोबर खेळताना मी भूतकाळात हरवून जाते.