

Sinhagad Valley Winter Bird Watching Spots
esakal
विशिष्ट रंगसंगतीमुळे रानपरीट अतिशय देखणा दिसतो. शिवाय तो जंगलातील अधिवासात, पालापाचोळ्यात आणि गर्द सभोवतालात अगदी एकरूप होऊन जातो. जमिनीवर बसला असेल, तर चटकन नजरेत येत नाही. जराशीही चाहूल लागली, तरी लागलीच उडून जातो आणि दाट झाडांमध्ये दिसेनासा होतो.
हिवाळ्याची सुखद चाहूल लागली, की अनेक विदेशी पक्षी आपल्याकडे स्थलांतर करून येतात. हे परदेशी पाहुणे जणू गुलाबी थंडीच आपल्यासोबत घेऊन येतात. या पक्ष्यांच्या आगमनाने सभोवतालचा निसर्ग अजूनच रंगतदार होऊन जातो. सिंहगडाच्या पायथ्याला असणारी व्हॅलीदेखील याला अपवाद नाही. येथे असलेली नैसर्गिक वनसंपदा, पाण्याचे जिवंत झरे आणि येथील भूभाग यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास तयार झालेला आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सिंहगड व्हॅली काही खास स्थलांतरित पक्ष्यांनी फुलून जाते. झऱ्यावर पाणी पिण्यासाठी उतरणारे पक्षी पाहताना मन अक्षरशः हरखून जाते.
जानेवारी महिन्याचे दिवस होते. पहाटेच सिंहगड व्हॅली गाठली. धुक्याच्या दुलईत हरवलेला सिंहगडही लांबून विलक्षण देखणा दिसत होता. अजून पुरेसं उजाडलं नव्हतं. आज कोणकोणते पक्षी पाहायला मिळतील, या विचाराने उत्साह दाटून आला होता. ठरलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत माझ्याआधी आलेले अनेक पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि फोटोग्राफर तिथे आपापली जागा पकडून बसले होते. त्यामुळे आम्हाला बसायला एकही मोक्याची जागा उरली नव्हती. पण त्याचे काही वाटले नाही. समोर उलगडणारे विहंगम दृश्य पाहण्यासाठी माझी कितीही वेळ उभे राहण्याची तयारी होती.