

Shivaji Maharaj Forts
esakal
प्रा. डॉ. गणेश राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गिरिदुर्ग आणि जलदुर्ग बांधले आणि विकसित केले. या किल्ल्यांमुळे दख्खन क्षेत्राला व्यापणारी रक्षक साखळी तयार झाली. या किल्ल्यांच्या जाळ्याने मराठा साम्राज्याला राजकीय आणि लष्करी वर्चस्व मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे जाणून युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेल्या १२ किल्ल्यांविषयी...
'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ अशा शब्दांत रामचंद्रपंत अमात्य यांनी किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. ‘हे राज्य तर तीर्थरूप कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले.’ या दोन वाक्यांमध्ये स्वराज्याचे मर्म दडले आहे. गिरिदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग, वनदुर्ग यांची साखळी करून स्वराज्य स्थापना व स्वराज्य विस्तार करण्याची कामगिरी मध्ययुगात छत्रपती शिवाजी महाराजांनी बजावली यातच त्यांचे मोठेपण दडले आहे. म्हणून तर शिवछत्रपतींना दुर्गराज असेही म्हटले जाते. मध्ययुगात जलदुर्ग बांधणारे ते एकमेव होत. या संदर्भात अमात्य लिहितात, ‘(जे शत्रू) जलदुर्गसहित होते यांस नूतनच जलदुर्ग निर्माण करून पराभविले.’ यामुळेच तर महाराज केवळ नूतन सृष्टीच निर्माण करू शकले.
महाराज केवळ किल्ले निर्माण करून स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांच्या डागडुजीसाठी तरतूद करणारे ते कुशल राजे होते. राज्याभिषेकापूर्वीच त्यांनी पुढील किल्ल्यांसाठी स्वतंत्र तरतूद केली होती. रायगडसाठी पन्नास हजार होन; सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, पुरंदर, राजगड यांसाठी प्रत्येकी दहा हजार होन; प्रचंडगड, प्रसिद्धगड, विशाळगड, महिपतगड, सुधागड, लोहगड, प्रबळगड, श्रीवर्धनगड, मनरंजन यांसाठी प्रत्येकी पाच हजार होन; तसेच कोरीगड, सरलगड, महिधरगड, मनोहरगड या किल्ल्यांसाठीही अशीच तरतूद केली होती.