Nature
Esakal
दीपाली ठाकूर
रात्र मिट्ट काळोखी असो वा टिपूर चांदण्याची असो, तिच्या प्रत्येक प्रहराचं स्वतंत्र स्क्रिप्ट असतं इथं. ते वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी सूक्ष्म, अतींद्रिय शक्ती हवी. पाणवठ्यावर, पायवाटांवर, झाडांच्या बुंध्यांवरही मग हे स्क्रिप्ट सापडतं. फक्त ती लिपी वाचता यायला हवी.
कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात,
देखूनी उदया तुझ्या जकुळे जाती अती हर्षुनी,
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरी जाउनी
अर्थात, सूर्योदय होताच पक्षीगण आनंदित होतात; मात्र रात्रभर निर्धोकपणे संचार करणारी हिंस्र श्वापदं तेव्हा आडोसा शोधतात.
सृष्ट-दुष्टप्रवृत्ती, आशा-निराशा, प्रसन्नता-उदासीनता या परस्परविरोधी जोड्यांमधून रात्रीच्या पारड्यात कायम नकारात्मक दान पडलं आहे. खरंतर एखाद्याला चांगलं ठरवण्यासाठी दुसऱ्याला वाईट ठरवण्याची गरज ती काय? उगवत्या सूर्याला वंदन करत नव्या दिवसाचं स्वागत करताना हे साधं तत्त्व आपण विसरतो. रात्रसुद्धा रोज नवीच असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तिचा जो भाग सूर्यासमोर येतो, तिथं दिवस असतो आणि विरुद्ध बाजूला रात्र.नाण्याच्या एका बाजूला छापा असला, की साहजिकच दुसऱ्या बाजूला काटा असावा तसं साधं-सोपं गणित आहे यामागे! कुणाला दिवस मानवतो, कुणाला रात्र! निसर्गात अविरतपणे चालणाऱ्या दिवस-रात्रींच्या या चक्राशी प्रत्येक जीवाला मात्र आपापल्या जैविक प्रेरणेनं जुळवून घ्यावं लागतं. मनुष्यही त्यास अपवाद नाही.
रात्रीच्यावेळी अचानक दिवे जातात आणि त्या मिट्ट काळोखात डोळ्यांत बोट घातलं, तरी काही दिसणार नाही असं जेव्हा आपल्याला वाटू लागतं, तेव्हा अवघ्या काही क्षणांत जादूची कांडी फिरावी तसं काहीतरी होतं. अस्पष्ट का होईना, पण थोडं थोडं दिसू लागतं. किमान अंधारात चाचपडावं, धडपडावं लागणार नाही, इतकं तरी वावरता येणं आता जमणार असतं. जादू नसते ही, चमत्कार तर नाहीच नाही! हीच ती जीवाची भवतालाशी जुळवून घेण्याची क्षमता! डोळ्यांतील बाहुल्यांभोवती असणारे स्नायू अशा वेळी आकुंचन पावतात, ज्यामुळे बाहुल्या रुंदावतात. प्रकाशकिरणांच्या शिरकाव्यासाठी तिथं थोडा अधिक अवकाश तयार होतो आणि आपल्याला बाह्याकृती तरी दिसू लागते. सृष्टीच्या रंगमंचावर नानाविध पात्रांच्या भूमिका असलेली अशी असंख्य नाट्यं घडत असतात या ‘ब्लॅकआऊट’मध्येसुद्धा! गंध, ध्वनी आणि प्रकाश यांच्या सुंदर संयोजनानं ती अधिक रंगतात.