
सुहास देसाई
ओढा ओलांडून विसाव्यासाठी टेकलो. सभोवती दाट जंगल, डोंगरावरून वेगाने येणारा पाण्याचा प्रवाह, ओढ्यातून वेगाने खाली कोसळणारा प्रपात आणि त्याचा अंगावर शहारे आणणारा आवाज अनुभवताना सर्व जगाचा विसर पडला होता.
खरोखरच अद्भुत अनुभव! दरवर्षी असा जोराचा पाऊस असतोच असे नाही. त्यामुळे असा आगळावेगळा निसर्ग अनुभवता येतोच असे नाही.
जुलै महिना म्हणजे धुवांधार कोसळणाऱ्या पावसाचा महिना. शेतकऱ्यांचा लावणीचा, पेरणीचा हंगाम. शेतकरी पेरणीसाठी घात कधी येते याची आतुरतेने वाट बघत असतात. पंढरीची वारीही याच दरम्यान येते.
त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिना हा पन्हाळगड-पावनखिंड ट्रेक करण्याचा हंगाम. वारकरी ज्याप्रमाणे वारीची वाट बघत असतात त्याचप्रमाणे या भ्रमंतीची आवड असणारे व नित्यनियमाने हा ट्रेक करणारे आणि नवखे असे सारेजणच दरवर्षी या मोहिमेची वाट पाहत असतात.