विश्वाचे आर्त ।डॉ. सदानंद मोरे
विज्ञान तंत्रज्ञानातील, औद्योगिक क्रांतीतील, प्रबोधनातील, विचारप्रणालीतील इत्यादी पण त्यांच्या संदर्भात ‘Post-human’ असा शब्दप्रयोग करायची वेळ कधी आली नव्हती. उलट त्या एकेका बदलामुळे मानवामधील ‘मानवत्व’च प्रकर्षाने प्रगट होत गेले असेच मानले जाई. आता हा शब्दप्रयोग करायची वेळ आली याचाच अर्थ कुठेतरी, काहीतरी गडबड आहे हे निश्चित. हा शब्दप्रयोग व्हायचे कारण दुसरे तिसरे काही नसून कृत्रिम बुद्धिमत्ता आहे एवढे सांगितले तरी पुरे.
जगाचा आजचा जो आकार आहे आणि यानंतर त्यात जे काही बदल होणार आहेत. ते घडवणाऱ्या शक्ती म्हणजे निसर्ग, तंत्रज्ञान आणि राजकारण. त्यातील निसर्ग ही माणसाला मिळालेली अशी वस्तू आहे, की जी त्याच्या जगण्याचा आधार आहे. या निसर्गाला आपल्या जगण्यासाठी जास्तीत जास्त अनुकूल करून घेण्यासाठी त्याला विज्ञानातून सिद्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. राजकीय सत्तेच्या माध्यमातून या तंत्रज्ञानावर ताबा ठेवून त्याच्यामार्फत जगाला आपणाला हवा असणारा आकार देता येतो. येथे ‘जग’ या शब्दात आपल्या भोवतालचा दत्त (Given) निसर्ग म्हणजे संपूर्ण सजीव-निर्जीव सृष्टी अभिप्रेत आहे.
या सृष्टीतील मानव बाजूला काढून तिच्याकडे पाहिले तर असे दिसते, की ती स्वतः मानवी व्यवहारांचे अधिष्ठान असली, तरी त्यांपासून अलिप्त वा उदासीन असते. ती तिच्या नियमांनुसार चालते. मानवाला विशेष सवलत देत त्याला नियमांना अपवाद करायचे तिला काही कारण नसते. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणाऱ्या माकडाला गुरुत्वाकर्षणाचा नियम जितका लागू होतो, आधाराशिवाय आकाशात उडू शकणाऱ्या पक्ष्याला जितका लागू होतो, तितकाच तो मानवालाही लागू होतो.