

Inflation and rupee value
esakal
महागाई दर ३.८८ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे रिझर्व्ह बँक व सरकार त्याकडे बारीक लक्ष देतील व चलनवाढीचा दर कमी करण्याचा प्रयत्न करतील, असे दिसते. रिझर्व्ह बँकेने ऑइल कंपन्यांना खुल्या बाजारातून डॉलर खरेदी करण्यास मज्जाव केला आहे. रुपया डॉलर विनिमय दर सुधारण्यास त्यामुळेच मदत झाली आहे. तरीही आजचा ९२.८ रुपये प्रतिडॉलर ९० रुपयांपर्यंत खाली यायला हवा. परदेशी चलनाचा साठा ७० हजार कोटी डॉलर आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँक खुल्या बाजारात विक्री करू शकते.
दोनच वर्षांपूर्वी रणबीर आणि श्रद्धा कपूर या जोडीचा एक चित्रपट आला होता, तू झुठी मैं मक्कार नावाचा. त्याने बराच गल्ला जमवला. त्यातला हिरो ‘ब्रेकअप कन्सल्टंट’ (जोडप्यांचे ब्रेकअप करून देणारा) असतो. नायक, नायिका एकमेकांशी सतत खोटे बोलत असतात. या चित्रपटाची आठवण होईल, असा खेळ आज भू-राजकीय जगतात रंगला आहे. ट्रम्प यांनी इराणबद्दल केलेले किमान सात दावे इराणने फेटाळून लावले आहेत. इराण आपले समृद्ध युरेनियम अमेरिकेला देण्यास तयार झाला आहे, हा ट्रम्प यांचा दावा तर कपोलकल्पित असावा हे कुणालाही कळेल. इराणने हे विधान पूर्णपणे खोटे ठरवले आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र इराणने स्पष्ट केले, की या जलमार्गावरील नियंत्रण अद्याप त्यांच्याकडेच आहे आणि जहाजांना त्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश नाही. दोन्ही देशांमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात आहे, कारण इराणच्या नौदलाचा पूर्ण नायनाट झाला असून अमेरिकेने विजय मिळवला आहे, असा ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळून लावला. तो ‘अतिशयोक्त’ आणि ‘असत्य’ असल्याचे म्हटले आहे. अजूनही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद असल्याने शांतता करार हवेतच आहेत, हे स्पष्ट केले आहे.