Roswell
Esakal
कॉन्स्पिरसी फाइल्स । रवि आमले
रॉसवेल यूएफओच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले. मेजर मार्सेल यांच्याप्रमाणेच आणखीही काही साक्षीदार आता समोर येऊ लागले होते. आणि त्यातून एक धक्कादायक चित्र उभे राहिले होते. सारेच भयंकर होते. आणि त्याहून भयंकर होता तो दुसरा गौप्यस्फोट...
न्यू मेक्सिकोतील एक नगर - रॉसवेल. तारीख २ जुलै १९४७. वेळ रात्री पावणे दहाची. दिवसभरच्या रणरणत्या उन्हाने तापलेले वातावरण आता थंड झाले होते. शीतल वारे वाहत होते. डॅन विल्मॉट आणि त्यांची बायको सारे कामधाम आवरून घराच्या ओवरीत हवा खात बसले होते. अचानक डॅनला आकाशात एक मोठी चकाकती वस्तू दिसली. अत्यंत वेगाने ती जात होती.
डॅन आणि त्याची पत्नी दोघेही अंगणात धावले. दोन बशा एकमेकींना चिकटल्यासारखी ती अंडगोलाकार वस्तू आतून पेटल्यासारखी चमकत होती. त्यांनी पाहिले, अवघ्या ४०-५० सेकंदांत ती त्यांच्या घरावरून उडत दूर आकाशात अदृश्य झाली.
आपण काय पाहिले हे? त्यांना काही कळेना. कोणास हे सांगितले, तर गावात लोक हसतील. त्यांनी कोणाकडेही हा विषय काढला नाही. हे ८ तारखेपर्यंत. त्यादिवशी रॉसवेलच्या वृत्तपत्रात - रॉसवेल डेली रेकॉर्डमध्ये पहिल्या पानावर मुख्य बातमी झळकली - ‘आरएएएफ कॅप्चर्स फ्लाइंग सॉसर ऑन रँच इन रॉसवेल रिजन’. आरएएएफ म्हणजे रॉसवेल आर्मी एअर फिल्ड. त्यांच्या हाती उडती तबकडी लागली. बातमी ना कोण्या ‘सूत्रा’ने गुंडाळलेली, ना ‘सब से तेज’, ना ‘एक्सक्लूजिव्ह’. त्यामुळे विश्वासार्ह होती.
त्यात म्हटले होते - ‘रॉसवेल एअर फिल्डच्या हाती उडती तबकडी लागली आहे, अशी घोषणा येथील ५०९व्या बंबार्डमेन्ट ग्रुपच्या गुप्तचर अधिकाऱ्याने आज दुपारी केली. गुप्तचर अधिकारी मेजर जे. ए. मार्सेल यांच्या परवानगीने विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आपल्या जागेमध्ये काही उपकरणे सापडली असल्याची माहिती एका निनावी पशुपालक शेतकऱ्याने शेरीफ जीओ विलॉक्स यांना दिली. त्यानंतर मेजर मार्सेल आणि त्यांचे सहकारी त्या शेतकऱ्याच्या रॉसवेलनजीकच्या शेतावर गेले व तेथून त्यांनी ती तबकडी प्राप्त केली.’ डॅन विल्मॉटच्या लक्षात आले, की हा आपण पाहिलेला चमकता गोळा.