कॉन्स्पिरसी फाइल्स । रवि आमले
कोणत्याही षड्यंत्र सिद्धांतात वाचकाच्या बुद्धीचा घात करणारे सूत्र दिसते. तेच सूत्र वापरून रॉथशिल्ड यांची अशी प्रतिमा तयार करण्यात आली, की ती अत्यंत क्रूर, कपटी, स्वार्थी, लालची, सैतानी अशी मंडळी आहेत. पण नेमकी आहेत कोण ही रॉथशिल्ड आणि मंडळी?
व्हॉट्सॲपवर आलेले काही संदेश वाचून अनेकांना असे वाटते, की त्या संदेशावर हसावे की रडावे? तो मजकूर बिनधास्त ‘फॉरवर्ड’ करणाऱ्याच्या बालबुद्धीचे कौतुक करावे, की आपणास मंदबुद्धींच्या टोळीत समाविष्ट करण्यासाठी चाललेल्या त्याच्या धडपडीबद्दल त्यास मनोमनी चार भकारयुक्त विशेषणे लावावीत? असे अनेक फोकनाड संदेश आपणांस येत असतात. त्यातला हा एक ‘फॉरवर्ड’ कधी ना कधी आपल्या व्हॉट्सॲपवर नक्कीच आला असेल, की ‘भारतास मिळालेले स्वातंत्र्य बनावट आहे!’