Color science
Esakal
प्रज्ञा इंगवले-काळसकर
संपूर्ण विश्व रंगमय आहे. मनुष्य आणि प्राणी या रंगांच्या अद्भुत जगात रमतात. इंद्रधनुष्यापासून ते मानवनिर्मित कलाकृतींपर्यंत सर्वत्र रंग आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. दृश्यकलेत रंग फक्त सजावटीसाठी नसतात; ते भावना फुलवतात, विचारांना आकार देतात आणि सांस्कृतिक कथा उलगडतात. हे बहुआयामी रंगविश्व म्हणजे जणू अनंत संवेदनांच्या प्रवासाचा अनुभव... जिथे प्रत्येक छटा, प्रत्येक टोन आपल्याला एक नवा अर्थ आणि नवा संदेश देतो. अशा बहुरंगी रंगांचा अंतर्मुख करणारा प्रवास...
भाग १
रंगांचा शास्त्रीय पाया
रंगांचा अनुभव हा प्रकाश, मानवी डोळे आणि मेंदू यांच्यातील समन्वयाचा भाग आहे. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी प्रथम प्रकाशाच्या भौतिकशास्त्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेच या अनुभवाचे मूळ आहे.
पांढरा प्रकाश विविध रंगांच्या मिश्रणाने तयार झालेला असतो, हे अठराव्या शतकात सर आयझॅक न्यूटन यांनी दाखवून दिले. त्याला ‘दृश्यमान वर्णपट’ असे म्हणतात. त्रिकोणाकार प्रिझममधून पांढरा प्रकाश पाठवल्यावर तो तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा (इंडिगो) आणि जांभळा या सात रंगांमध्ये विभागला जातो. या प्रत्येक रंगाचा तरंगविस्तार (Wavelength) वेगळा असतो.