ajintha verul
Esakal
Premium|Indian heritage: प्राचीन भारतीय रंगभाषेचा समृद्ध वारसा; गुहाचित्रांपासून अजिंठा-वेरूळपर्यंतचा प्रवास
गोपाल जोगे
आदिम काळापासून मानवाला रंगांचे विलक्षण आकर्षण आहे. गुहाचित्रांपासून अजिंठा-वेरूळच्या भित्तीचित्रांपर्यंत रंगांची ही परंपरा दिसते. प्राचीन ग्रंथांत रंगनिर्मिती, तंत्र, प्रतिकात्मकता व कलेतील उपयोगाचे सविस्तर मार्गदर्शन आढळते. या रंगभाषेतूनच भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा समृद्ध वारसा उलगडतो.
मानवाला अगदी आदिम काळापासून रंगांचे आकर्षण आहे. याचे कारण मानवी मेंदूत असलेली चित्रस्मृती साठवण्याची विलक्षण क्षमता. आपल्या आसपासच्या घटना-प्रसंगांचे दैनंदिन अनुभव तो चित्रमय पद्धतीने आपल्या मस्तिष्कात बराच काळ ठेवू शकतो. अशा स्मृतींचे जसेच्या तसे ‘चित्रण’ करण्याची क्षमता असलेली माणसे तर विशेष म्हणावीत अशी. निसर्गातील विविध घडामोडींचे, पाहिलेल्या-जाणलेल्या अनुभवांचे ‘रंगविक्षेप’ मानवी मनाच्या अंतःपटलावर आदिमावस्थेपासून रेखल्या आहेत.
हे आदिम रंगीबेरंगी जिवंत अनुभवांचे चित्रण मोजक्या रंगांद्वारा आजही गुहाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येते. याच चित्रभाषेतून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो, जर आपल्याला ही संवादाची कला साधता आली तर! या रंगभाषेच्या माध्यमातून निसर्गाचे रंग वापरून निसर्गालाच सुंदर करण्याचे कौशल्य मानवाने काळाच्या ओघात प्राप्त केले. भारताला प्रागैतिहासिक काळापासून ते वर्तमान काळापर्यंत सलग असा रंगांचा इतिहास आहे. सर्वांनी अभिमान बाळगावा असा हा समृद्ध वारसा. आजतागायत विविध माध्यमांतून रंगांची उधळण मानवाने अनुभवली, पाहिली आणि त्यातून ही रंगांची भाषा घडत गेली.
