

Seuna Yadavas of Devagiri history
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
या विवेचनात संत नामदेवांच्या काळातील राजकीय परिस्थिती कशी होती, ती नामदेवांची आणि त्या काळातील अन्य संतकवींची जडणघडण पोषक होती की विपरीत होती, याविषयी विचार करणे गरजेचे ठरते. इथवरच्या विवेचनात राजा रामदेवाच्या काळात वारकरी पंथाच्या संतकवींना कोणताही आश्रय किंवा आधार नव्हता. तसाच तो नामदेवांनासुद्धा नव्हता या मतापर्यंत यावे लागते.
ना मदेवांच्या एकूणच कर्तृत्वाचा विचार करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली तो काळ कसा होता, राजकीय परिस्थिती कशी होती, त्या परिस्थितीचा प्रभाव किंवा परिणाम तत्कालीन समाजावर कसा पडला होता याविषयी विचार करणे आणि त्या परिस्थितीच्या, काळाच्या परिप्रेक्ष्यात त्यांनी केलेले कार्य तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच पुन्हा पुन्हा त्यांच्या लौकिक, कौटुंबिक जीवनाकडे जावे लागते.
संत नामदेवांचा जन्म १२७० सालचा. त्यांच्या आधी महाराष्ट्रात वारकरी संतपरंपरा फारशी दिसत नाही, आणि असलीच तर क्षीण स्वरूपात अस्तित्वात होती. तिचा प्रभाव फारसा जाणवत नव्हता. नामदेवांच्या घराण्यात जरी त्यांच्या आधीच्या सहाव्या-सातव्या पूर्वजांपासून विठ्ठलभक्ती अस्तित्वात असली, पंढरपूरची वारी ते करीत असले, तरी त्या सगळ्यांना नैमित्तिक स्वरूप होते. वारकरी संप्रदाय असा कोणताही संप्रदाय त्या काळी अस्तित्वात नव्हताच. नामदेवांच्या आधी काही संत होऊन गेल्याचे दिसते. त्यात संत सावता माळी (१२५०), संत गोरा कुंभार (१२६७), संत चोखामेळा (१२६८) यांचा उल्लेख प्रामुख्याने करता येईल. हे सगळे संत नामदेवांपेक्षा किमान काही वर्षांनी मोठे होते. त्यांच्या समकालीन व काहीसे लहान असलेले संत सेना महाराज (१२७८) यांचाही उल्लेख करता येईल. या संतकवींच्या रचनाकाळाविषयी विचार करता संत नामदेवांच्या प्रेरणेकडेच जावे लागते. आणि हे सगळे संत बहुजन समाजातील होते, हे पुन्हा लक्षात घ्यावे लागेल.