

Rupee vs Dollar
esakal
आयात धातूंच्या अमर्याद तेजीत घसरलेल्या रुपयाचा मोठा वाटा आहे. चालू वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया ६.१९ टक्के खाली आला आहे. आज ते आशिया खंडातील सर्वात कमकुवत चलन ठरले आहे. चीनचा युआनदेखील या खालच्या नंबरच्या शर्यतीत आपल्या मागे-पुढे आहे, पण तेथील सरकारचे चलनावरील नियंत्रण पाहता तोही सरकारी धोरणाचा भाग असू शकतो. आपले मात्र तसे नाही.
डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात निफ्टीने पुन्हा तोच ऊन-पावसाचा खेळ केला. आठ तारखेपासून पुन्हा एकदा पडझड सुरू झाली आणि दहा तारखेपर्यंत बाजाराचा तेजोभंग करत २५७५०ची पातळी निफ्टीने दाखवली. निफ्टी जरी तीनशे अंशानेच खाली आली असली, तरी मिड आणि स्मॉल कॅपमधील धुलाई आत्मविश्वास कमी करून गेली. सप्ताहाचे अखेरचे दोन दिवस मात्र तेजीचे गेले. अमेरिकेत फेडने व्याजदर कमी केले, या बातमीवर बाजार सुधारला. खरे म्हणजे आता अमेरिका संपली, डॉलर घरंगळणार, मोठी मंदी येणार, या सर्व हाकाट्या खोट्या ठरवत डाऊ जोन्सने नवा उच्चांक गाठला. एसएनपी ५०० व नॅस्डॅक जरी सप्ताहाअखेर किरकोळ खाली आले असले, तरी तेथील शेअर बाजार व त्यांची री ओढणारे युरो आणि आशियाई शेअर बाजार वरच्या पातळीवर स्थिर व संतुलीतच होते. भारतीय बाजार मात्र देशी व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या तालावर नाचत, गोंधळलेल्या अवस्थेत होते. मिड कॅप १५० निर्देशांक २१४८५पर्यंत खाली येऊन पुन्हा २२१५२ अंशावर बंद झाला. मागील लेखात (धरलं तर चावतयं..., ता. २० डिसेंबर) म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांच्या मर्जीतले केन्स, अॅम्बर आणि इंडिगो खाली आल्यामुळे पंटर्स नाराज झाले. याआधी मंदीवाल्यांच्या हातात सापडला होता ट्रेन्ट! झुडिओ दालनाच्या यशाची धुंदी शेअरला ₹ ८,३००पार घेऊन गेली, पण एक तिमाही निकाल अपेक्षाभंग करून गेला. त्यामुळे नवी दालने सुरू होण्याची संख्या कमी झाली, त्याने ट्रेन्टची हवाच काढून घेतली. आजही चार हजार रुपयांच्या भावात या शेअरची दुर्दशा संपली की नाही ते कळत नाही. तीच परिस्थिती टाटा इलेक्सीची! सुज्ञ गुंतवणूकदारांच्या आता लक्षात आलेच असेल, की कुठलाही शेअर अतिमहाग झाला की त्याला खाली यायला काहीतरी निमित्त लागते. एखादा निकाल अपेक्षेप्रमाणे असत नाही किंवा सरकारी धोरणात किरकोळ बदल होतो, एखादी वाईट बातमी येते आणि शेअरची सद्दी संपते. हे आपण संरक्षण क्षेत्रातील, रेल्वे क्षेत्रातील शेअरमध्ये होताना बघितले आहे. अगदी बजाज फायनान्ससारखा शेअरसुद्धा या चक्रातून गेला आहे. आमच्या संपूर्ण लेखमालेत आम्ही नियमित नफा वसूल करायला सांगतो ते यामुळेच. हा निर्णय घेणे नेहमीच कठीण व धाडसाचे असते. त्यामुळेच शेअर बाजारात मोठे पैसे मिळवणे हे नेहमीच आव्हानात्मक असते, पण मिळवल्यास मोठे समाधान मिळवून जाते हे खरे.