नेहा लिमये
सूफी संगीताचं एक वैशिष्ट्य मला भावतं. दुसरा कुठलाही संगीतप्रकार त्याच्याबरोबर आणून बसवा, सूफी संगीत त्याचा वेष चढवून तयार होतं. कव्वालीबरोबरच मजाजी, हाकीकी, ट्रान्स कसलाही मेकअप केला, तरी मूळचं सूफी सौंदर्य लपून राहत नाही. त्यामुळे सूफी संगीतात प्रयोग करायला भरपूर वाव असतो.
‘सूफी’ शब्द कुठल्या अरबी / फारसी शब्दापासून आला याबद्दल मतमतांतरं आहेत. कुणी म्हणतं ‘सफा’ म्हणजे पवित्र, त्यावरून सूफी; तर कुणी म्हणतं ‘सफ’ म्हणजे ‘ओळ/ रांग’ - कयामत येईल तेव्हा अल्लाहसमक्ष पहिल्या ओळीत कोण असेल, तर आयुष्यभर फक्त अल्लाहची भक्ती करणारा ‘सूफी’.
त्यातल्या त्यात कौल झुकताना दिसतो तो ‘सूफ’कडे. सूफीवाद नुकताच रुजू लागला होता त्या सुरुवातीच्या काळात सूफीपंथीय ‘सूफधारी’ असत. साधेपणाचं प्रतीक म्हणून ‘ऊनी वस्त्र’ (लोकरीचे कपडे) घालत. त्यामुळे भौतिक सुखांपासून दूर राहणारे, आध्यात्मिक शुचितेकडे मार्गक्रमण करणारे ते सूफी असा एक सर्वसंमत अर्थ रूढ झाला.