सागर गिरमे
आपल्याकडे शहरं वाढताहेत, मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीयांची संख्याही वाढतीये. अशातच स्वतःचा कन्फर्ट जपत सध्या प्रतिष्ठेचं लक्षण मानली जाणारी कार घेण्याकडे बहुतांशजणांचा कल आहे. पण लोक आता नुसतीच कार घेऊन थांबत नाहीत, तर तिचा लुक चेंज करणं आणि ती जास्तीत जास्त कस्टमाइज करण्याचा ट्रेंड सध्या रुजू पाहतोय.
कारचं व्हर्जन कोणतंही असो, ग्राहक त्यात आपल्या आवडीनुसार बदल करून घेणं पसंत करतात. त्यासाठी ॲक्सेसरीजचाही मुबलक वापर केला जातो. पण फक्त कार सजवणं किंवा सुंदर दिसणं एवढ्यापुरताच आता त्यांचा वापर उरलेला नाहीये. तर त्यापुढे जात सुरक्षेच्या दृष्टीनंही या ॲक्सेसरीज महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्टायलिश पण तेवढीच सुरक्षितता वाढवणारी, आरामदायी आणि हायटेक ॲक्सेसरी लावताना एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे कायद्याचे नियम पाळणं; नाहीतर त्रास नक्की होऊ शकतो.
ॲक्सेसरीजचं मार्केट
भारतात कार ॲक्सेसरीजचा बाजार सध्या सुमारे २० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यात दरवर्षी १० ते १२ टक्क्यांची वाढ होतीये. २०२५मध्ये आत्तापर्यंत डॅश कॅमची अंदाजे १० लाख युनिट्स, जीपीएसची पाच लाख युनिट्स, वायरेलस चार्जिंग पॅडची १२ लाख युनिट्स, ॲम्बियंट लायटिंग किटची १० लाख युनिट्स, पोर्टेबल ईव्ही चार्जरची दोन लाख युनिट्स, ओबीडी स्कॅनरची पाच लाख युनिट्स विकली गेली आहेत.