Human values
Esakal
मयूर भावे
हिरा महाग असल्याने प्रत्येक घरात नसतो; पण हिऱ्यासारखी माणसं मात्र नक्कीच असतात. त्यांची किंमत ओळखून योग्य वेळी कोंदणासारखी साथ दिली, तर त्यांची झळाळी वाढते. खरी संपत्ती म्हणजे ही हिऱ्यासारखी माणसंच! त्यांचा सन्मान करणं, त्यांचं जतन करणं, त्यांची जाणं ठेवणं हेच आपलं खरं कर्तव्य.
माजघरात सुरू असलेला चैतन्य व त्याच्या आईतला संवाद पुढच्या खोलीत स्पष्ट ऐकू येत होता. बाप ह्या नात्याने प्रवीण तो संवाद ऐकत होता. त्याची बायको मानिनी तिच्या मुलाला - चैतन्यला सांगत होती, ‘‘बाबा, तुझ्या ॲडमिशनसाठी कर्ज काढायचं म्हणत होते. मात्र, मीच त्यांना नाही सांगितलं. आधीच आपल्या घराचे हप्ते सुरू आहेत. त्यात तुझ्या आवडीच्या कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी म्हणून कर्ज काढलं, तर अजून बोजा वाढेल. म्हणूनच मी त्यांना म्हटलं माझा पोरगा हिरा आहे. तो कुठेही शिकला, तरी नाव काढेलच...’’ ते ऐकताना प्रवीणच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याचं मन एकदम २५-३० वर्षे मागे गेलं.
एका छोट्या गावातून कोल्हापूरसारख्या त्या मानाने मोठ्या शहरात शिक्षणासाठी यायला निघालेल्या छोट्या प्रवीणच्या हातात १० रुपयांची नोट ठेवताना त्याची आजी हेच वाक्य म्हणाली होती... ‘‘माझा पव्या जाईल तिथं नाव काढील माय... हिराय त्यो...!’’ हे ‘हिरा’ असणं म्हणजे काय असणं, ते प्रवीणनं स्वतःचं छोटं, पण नेटकं जग उभं करून सिद्धही केलं होतं. चांगलं शिक्षण घेत इमाने-इतबारे नोकरी करत त्यानं मुलाला चांगलं वाढवलं आणि आता तो त्याचं ‘हिरापण’ सिद्ध करणार होता.