Diamands
Esakal
इरावती बारसोडे
दक्षिण आफ्रिकेतल्या ज्या राष्ट्रांना हिऱ्यांसारखी मौल्यवान निसर्गदत्त देणगी मिळाली होती, त्याच राष्ट्रांतील स्थानिकांचे मानवी हक्क या हिऱ्यांनी हिरावून घेतले. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील, विशेषतः अँगोला, सिएरा लिओन आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथील हिऱ्यांबाबतीतल्या संघर्षांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं.
हि रा ही एक मौल्यवान चीजवस्तू; एकप्रकारची लक्झरीच. हिरा म्हटलं की झळाळणारा, लखलखता, मौल्यवान, अद्वितीय, दुर्मीळ अशा अर्थाची सारी विशेषणं आठवतात. पण या साऱ्या सकारात्मक विशेषणांबरोबर हिऱ्याला आणखी एक नकारात्मक विशेषणही जोडलं गेलं आहे, ते म्हणजे ‘रक्तरंजित’ हिरा... ‘ब्लड’ डायमंड!
या विशेषणाचा शोध मला अनपेक्षित पद्धतीनं लागला. ओटीटीचे असंख्य पर्याय उपलब्ध होण्याआधी टीव्ही चॅनेलवर जो कोणता चित्रपट लागेल तोच बघण्याशिवाय पर्याय नसायचा, तेव्हा कधीतरी मी ब्लड डायमंड नावाचा चित्रपट पाहिला होता. कोहिनूरसारख्याच एखाद्या अनमोल लाल रंगाच्या हिऱ्याची काहीतरी रोमँटिक गोष्ट असेल असं मला वाटलं होतं; शिवाय त्यात लिओनार्डो डिकॅप्रिओ हिरो आहे म्हटल्यावर तो चित्रपट पाहायलाच हवा ना! पण माझ्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. त्यावेळी मी तो चित्रपट पूर्ण पाहू शकले नाही, अर्ध्यातच सोडून दिला. कारण माझ्या कल्पनेतला ‘ब्लड डायमंड’ आणि यातला ‘ब्लड डायमंड’ फारच वेगळे होते.
नंतर कधीतरी मी ब्लड डायमंड शांतपणे पूर्ण पाहिला. २००६मध्ये आलेल्या या चित्रपटाची कथा वास्तवावर आधारित आहे हेही कळलं. पण हे वास्तव खरंच इतकं कटू होतं की चित्रपट निर्मात्यांनी जरा अतिच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली होती? इंटरनेटवर शोधाशोध केली तेव्हा खऱ्या ब्लड डायमंड्सची - कॉन्फ्लिक्ट डायमंड्सची - खरीखुरी कथा समोर आली... वास्तव अधिकच भीषण होतं.