

Climate change and geomagnetic shifts
esakal
डॉ. श्रीकांत कार्लेकर
पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे अनादी काळापासून पृथ्वीवर ऋतूंचे एक निश्चित चक्र सर्वत्र कार्यरत आहे. मात्र ऋतूंचे सध्या जाणवणारे आगमन आणि निर्गमन, तसेच ऋतूंचे गुणधर्म आणि प्रत यांमध्ये गेल्या काही काळापासून बदल होत असल्याचे वैज्ञानिकांप्रमाणेच सामान्य माणसांचेही निरीक्षण आहे.
साडेचार अब्ज वर्षांच्या पृथ्वीच्या जीवनकाळात तिच्या निर्मितीपासूनच ज्या अनेक अविस्मरणीय भूशास्त्रीय घटना घडल्या, त्यांचे माणसाला आकलन व्हायला मोठा कालखंड जावा लागला. पृथ्वीची गती, तिचा सूर्याभोवतीचा भ्रमणमार्ग, चंद्र व सूर्यग्रहण, ऋतुचक्र, पृथ्वीचे अंतरंग, कवचावरील खडक, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक यांसारख्या घटनांचा नेमका अर्थ कळेपर्यंत बराच काळ निघून गेला. सध्याच्या काळात तर वादळांची वाढती संख्या, अनपेक्षितपणे होणारी ढगफुटी, मॉन्सूनची बदलती वृत्ती, अचानक होणारे भूकंप, उष्णतेच्या लाटांचे वाढते प्रमाण यांसारख्या अनेक घटना आणि त्यांची न मिळणारी समाधानकारक उत्तरे यामुळे पृथ्वी वेगाने बदलू लागल्याचे संकेत सर्वत्र मिळू लागले आहेत.
आधुनिक काळात घातक वैश्विक किरणांपासून आणि सौरवादळांपासून पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या पृथ्वीच्या भूचुबंकीय क्षेत्रात वेगाने होणारे बदल, नव्याने तयार होणारे भूखंड आणि महासागर यांसारखे नवनवीन घटक समोर येत आहेत. आता तर पृथ्वीच्या भूचुंबकीय क्षेत्राला आजपर्यंतचे सगळ्यात मोठे छिद्र पडले असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेने अलीकडेच नोंदविले आहे. पृथ्वीभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या (मॅग्नेटिक फिल्ड) कवचातून वाट काढत घातक सौरऊर्जेने शिरकावही केला आहे. एका अंदाजानुसार २१व्या शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि या तापमानवृद्धीचे दूरगामी परिणाम होतील. आपण हे परिणाम आत्ताच अनुभवायला सुरुवात केली आहे.