Motherhood
Esakal
शिरीन म्हाडेश्वर
इतक्याजणांनी इतक्या वेळा सांगूनही अजिबात न पटलेली तीच गोष्ट आईनं सांगितल्यावर कुठेतरी स्वराला आपोआप समजत गेली. समजावून घ्यावीशी वाटली. विनासायास. तीन आठवडे खांद्यांवर वागवलेलं मणभर ओझं उतरवून खाली ठेवल्यावर वाटावं तसं तिला हुश्श... निवांत वाटलं.
कठं आपापल्या खोलीत एकटं झोपवतेस गं एवढ्या तान्ह्या पिल्लाला! त्यात तो पाळणा... पाळणा नुसता म्हणायला, झुलतपण नाही! रडेल नाहीतर काय!’’
तीच ती एकच गोष्ट आईनं पुन्हा स्वराला सांगायची या आठवड्यातली ही पाचवी वेळ. आई जे विचारतेय त्यावर तिच्याकडे उत्तर नव्हतं. तसंही फोनवर किती नि काय काय स्पष्टीकरण देत राहणार!
पहिलं बाळ हातात आल्यानंतर वादळात भरकटलेल्या नावेसारखं कसंबसं आईपण निभवत नेण्याचे, आपण जे करतोय ते बरोबर की चूक हे न कळण्याचे, मुळात चूक-बरोबर असं काही नसतंच हे उमजण्याआधीचे, बाळाच्या काळजीनं धास्तावलेले, गोंधळलेले, दमलेले, झोपाळलेले पहिल्यावहिल्या आईपणातले ते कोवळे दिवस. तेही परक्या देशातले.
‘‘आई अगं, इथे आपल्या बाजूला बिछान्यावर बाळाला झोपवायचं नाही म्हणतात. चुकून चादरीत गुरफटेल, पालथा पडला तर घुसमटेल म्हणून. बाळ एक वर्षाचं होईपर्यंत पाळण्यात असलं, तरी अंगावर चादर घालायची नाही असं वाचलं मी. नर्सपण म्हणाली.. ’’
‘‘कुठून आणलेत हे नियम! उगीच नको ते वाचत राहू नकोस अगं. असं काहीही व्हायचं नाही. बाळाची जागा आईच्या जवळ. तिच्या कुशीत. त्याला आपल्या नऊ महिन्यांच्या घराचा वास येतो आणि सुरक्षित वाटतं. छान झोप लागते. कमालीची ताकद असते आईच्या स्पर्शात.’’
आई सांगतेय ते कितीही आश्वासक वाटत असलं, तरी फक्त तेवढं करून बाळ रडायचं थांबेल, शांत झोपायला लागेल असा विश्वास काही स्वराला वाटत नव्हता. ती मख्ख चेहऱ्यानं व्हिडिओ कॉलमध्ये नुसती पाहत राहिली.
‘‘...आणि ओल्या बाळंतिणीनं कानाला रुमाल बांधायला हवा. कान उघडे नको टाकूस असे.’’
‘‘रुमाल? कसं अजागळासारखं दिसतं ते! मी नाही बांधणार! ’’
‘‘दिसू दे अजागळ. कोण बघायला येतंय तिथे? आधीच ती मरणाची थंडी तुमच्याकडची. कानात थंड वारं गेलं, तर आईचं दूध गरम कसं राहील! पोट दुखेल ना बाळाचं. त्याला सांगता येतंय का? आपण ओळखायला हवं.’’
‘‘दूध येईल तर ना! आणि रुमाल तर नाहीच बांधायचा मला! तेच तेच काय सांगत राहतेस सारखं?’’
इथं असं काहीच नाही. कुणी कौतुकाला नाही. दिवेलागणीची वेळ होते न होते तोवर रस्त्यावरून चिटपाखरूही गायब. त्यात संध्याकाळी चार वाजल्यापासूनच हातपाय पसरत जाणारा काळाकुट्ट भीषण अंधार. मागच्या अवघ्या दोन आठवड्यांत पडलेला तीस इंच बर्फ!! बाळाला घरी आणलं त्यादिवशी तर दिवसभर वादळ होतं. हॉस्पिटलमधून घरी येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजरेच्या टप्प्यात येईल तिथवर मैलोनमैल पसरलेला फक्त बर्फच बर्फ!