डॉ. बाळ फोंडके
मायटोकॉन्ड्रियाच्या जनुक वारशाची चिकित्सा केली गेली असती, तर ती दाता स्त्री माता असल्याचा निष्कर्ष काढावा लागला असता. पण त्या मुलाच्या अंगातील इतर सारी जनुकं बीजदात्री स्त्रीचीच होती. तीच बीजदात्री माता म्हणावं लागलं असतं. म्हणजेच त्या मुलाच्या दोन दोन माता आणि एक पिता असा त्रिवेणी संगम झाला होता.
आपल्यापैकी प्रत्येकाचा जनुकीय वारसा त्याच्या माता-पित्याकडून मिळालेला असतो. जेव्हा मातेचं बीज आणि पित्याचे शुक्राणू यांचं मीलन होऊन नवीन सजीवाचा उदय होतो, तेव्हा त्या दोघांच्या जनुकसंचयाची सरमिसळ होते.
तो वारसा त्या जिवाला मिळतो. पण अशी सरमिसळ होत असल्यामुळं त्या वारशातला आईचा हिस्सा कोणता आणि वडिलांचा कोणता हे सांगता येत नाही. सर्वसाधारणतः आपण जरी मूल वडिलांवर किंवा आईवर गेलं आहे, असं म्हणत असलो तरी ते संपूर्णतः सत्य नसतं.
शरीराची ठेवण म्हणजेच निरनिराळ्या अवयवांचा घाट काय किंवा निरनिराळ्या शरीरक्रिया काय, त्यांचं स्वरूप केवळ एकाच जनुकाकडून निर्धारित होत नाही. एकाहून अधिक जनुकांच्या समूहाकडून त्याची निश्चिती होत असते. त्या संचातील काही मातेची देणगी असू शकते तर काही पित्याची.