संपादकीय
‘वाघ वाचला, तर जंगल वाचेल’, ही उक्ती आपल्या संवर्धन प्रयत्नांचा मूलमंत्र ठरली आहे. यामागे कारण स्पष्ट आहे, की वाघ हा अन्नसाखळीच्या शीर्षस्थानी असतो. तो ज्या परिसंस्थेत राहतो, ती परिसंस्था टिकून राहते. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्रजातीचे रक्षण नसून, संपूर्ण जैवविविधतेच्या समतोलाचे आणि जंगलाचे संरक्षण असे म्हटले जाते.
भारताने गेल्या दोन दशकांत व्याघ्र संवर्धनात लक्षणीय प्रगती केली आहे. २०२५पर्यंत वाघांची संख्या ३,६००च्या पुढे गेली आहे आणि हे प्रमाण जगातील एकूण वाघांपैकी सुमारे ७५ टक्के आहेत. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
मात्र, या संख्यात्मक यशामध्ये अडकून राहणे आणि ‘आकड्यांची वाढ म्हणजे यश’ ही संकुचित धारणा बाळगणे आता धोकादायक ठरू शकते. कारण, आपण व्याघ्र संवर्धनाच्या पुढच्या टप्प्याकडे आता वाटचाल करीत आहोत.
वाघांच्या आकड्यांवर लक्ष केंद्रित केल्यास व्यापक पर्यावरणीय प्रश्न, मानवी संघर्ष, परिसंस्थेतील असमतोल, तसेच पारंपरिक वनजीवनाच्या अस्मितांकडे दुर्लक्ष होण्याचा सर्वाधिक धोका या टप्प्यावर स्पष्टपणे आपल्याला आता दिसू लागला आहे.