वृद्धपकाळात तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरातील या सहा सिस्टीमचा तोल सांभाळणे आवश्यक

या दशकातील झपाट्याने झालेल्या वैज्ञानिक संशोधनामुळे माणसाचे आयुष्यमान वाढले असले तरी खऱ्या अर्थाने सुधारले आहे का, ते ठामपणे सांगणे अवघड आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की वार्धक्य हा काही आजार नाहीये, तर ती एक नैसर्गिक अवस्था आहे, एक स्थित्यंतर आहे.
Senior Citizen
Senior Citizen Esakal

व्यायामाची साथ : डॉ. वर्षा वर्तक

आंद्रे मार्वच्या आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तकात एक प्रकरण आहे, ‘द आर्ट ऑफ ग्रोइंग ओल्ड, ग्रेसफुली’. म्हातारपण सुखात कसे घालवावे? तर म्हातारपण शक्य तितके इतरांना उपद्रवी होणार नाही अशाप्रकारे सांभाळावे. आपले शरीरस्वास्थ्य जर आपणच सांभाळले, तर मनही आनंदी राहते.

जेव्हा एखादे आनंदी आणि फिट आजी किंवा आजोबा मला भेटतात, तेव्हा पु.लं.चा ‘छान पिकत जाणारे म्हातारपण’ हा लेख कायम आठवतो.

वार्धक्याकडे झुकताना माणसानं कसं आनंदी जीवन जगावं, आपले दैनंदिन व्यवहार कसे नीटनेटके ठेवावेत आणि मुख्य म्हणजे आपली तब्येत कशी उत्तम ठेवावी, याचे छोटे छोटे दाखले त्या लेखात अत्यंत खुमासदार शैलीमध्ये पु.लं.नी लिहिले आहेत.

हा लेख नव्वदच्या दशकात लिहिलेला असला, तरी तो आजही तंतोतंत लागू आहे. उलट या लेखात सांगितलेले उपाय जास्तच गरजेचे वाटतात.

कारण या दशकातील झपाट्याने झालेल्या वैज्ञानिक संशोधनामुळे माणसाचे आयुष्यमान वाढले असले तरी खऱ्या अर्थाने सुधारले आहे का, ते ठामपणे सांगणे अवघड आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की वार्धक्य हा काही आजार नाहीये, तर ती एक नैसर्गिक अवस्था आहे, एक स्थित्यंतर आहे.

शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचे झाले, तर तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरातील सहा सिस्टीमचा तोल सांभाळणे आवश्यक असते. या सिस्टीम कुठल्या? तर -

  • हृदय आणि रक्ताभिसरण (Cardiac system)

  • मेंदू व मज्जासंस्था (Neurological system)

  • अस्थी आणि स्नायू (Skeletal system)

  • श्वसनसंस्था (Respiratory system)

  • किडनी/ मूत्रपिंड (Renal system)

  • पचनसंस्था (Digestive system)

जसजसं वय वाढत जातं, तसतशा यापैकी एखाद्या सिस्टीमच्या जरा जास्तच तक्रारी सुरू होतात. या तक्रारींचे प्रमाण कमी ठेवायचे असेल, तर संतुलित आहार आणि पुरेशा विश्रांतीबरोबरच शारीरिक हालचाली, नियमित व्यायाम चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे औषधांचा अतिरिक्त वापर व खर्च तर कमी होईलच, पण मनही आनंदी आणि उत्साही राहील. पण आता स्नायू कमकुवत होऊ लागलेले असतात, हाडेही ठिसूळ होऊ लागलेली असतात. त्यामुळे व्यायाम करायचा कंटाळा येतो.

शरीराची हालचाल कमी झाली, की त्याचा परिणाम अन्न पचनावर होतो, रक्ताभिसरणावर होतो, हृदय, किडनी आणि फुप्फुसांवरही होतो.

व्यायाम म्हटलं की सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर येते ते जिम. पण ज्यावेळेला तुमची हाडं, तुमचे स्नायू वयानुसार कमकुवत होऊ लागलेले असतात, त्यावेळी दुखापत होऊ न देता व्यायाम चालू ठेवण्यासाठी फिजिओथेरपिस्टचा रोल महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे गुडघे, कंबर इत्यादी दुखायची वाट न बघता आणि डॉक्टरांनी सांगितल्यावर मग व्यायाम सुरू न करता, फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानुसार व्यायाम सुरू केला पाहिजे.

फोम रोलर, योगा बेल्ट असे छोटे प्रॉप वापरून, स्वतःच्या वजनाचा उपयोग करून, तुमच्या गरजेनुसार करायचे व्यायाम फिजिओथेरपिस्ट प्लॅन करून देतो व ते कसे करायचे याचे प्रशिक्षणही देतो.

हे व्यायाम घरच्या घरी किंवा तुमच्या नेहमीच्या व्यायामाच्या ठिकाणीसुद्धा करू शकता. म्हणजे जर तुम्ही सकाळी फिरायला एखाद्या टेकडीवर जात असाल किंवा एखाद्या बागेत, हास्यक्लबमध्ये जात असाल, तर तेथेच हे व्यायाम करायचे, जिम वगैरे लावायची वेगळी गरज नसते.

वाढत्या वयाबरोबर येणारी मुख्य दुखणी कोणती? तर, हाडांची झीज, संधीवात, गुडघेदुखी, पाठदुखी अथवा कंबरदुखी. परंतु ॲस्प्रिन, नेप्रोसीन, आयबुप्रेफेन यांसारख्या वेदनाशामकांचे किडनीवर होणारे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत.

त्याऐवजी अल्ट्रासाउंड, लेझर किंवा आरपीडब्ल्यू शॉकवेव्ह अॅडव्हान्स्ड मशिन वापरून सुरुवातीला त्वरित वेदनाशमन करता येते. यामुळे पेनकिलर औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

एकदा का वेदना थांबल्या, की फिजिओथेरपीतील स्नायू बळकट करण्याचे व्यायाम सुरू करता येतात. दुखणं थांबलं आणि स्नायूंची ताकद वाढली, की आपोआप हिंडाफिरायचा उत्साह वाढतो.

प्रत्येकाला आपल्या शरीराच्या तक्रारींची कल्पना असते. तरुण वयात या तक्रारींकडे थोडंफार दुर्लक्ष करून चालतं. पण साधारण चाळिशीनंतर मात्र, दुर्लक्ष न करता योग्य वेळी ही सुरुवात केली तर पुढची गुंतागुंत, उदाहरणार्थ, गुडघ्याची, खुब्याची शस्त्रक्रिया वगैरे टाळता येतात.

आणि काही कारणामुळे जरी या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, तरी फिजिओथेरपीच्या मदतीने लवकरात लवकर परत हिंडता-फिरता येते.

गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही जवळपास तीस टक्के लोकांना पूर्वीसारखी लवचिकता जाणवत नाही. याचे कारण जरी आता गुडघा ‘तरुण’ असला, तरी स्नायू त्याला साथ देत नसतात. यासाठी शस्त्रक्रियेच्या आधी ‘प्रीहॅब’ आणि नंतर ‘रीहॅब’, तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या देखरेखी खाली होणे अत्यंत आवश्यक असते.

कोल्ड कॉम्प्रेशन थेरपी वापरून सूज लवकर कमी करता येते, फिजिओथेरपी मशिन वापरून वेदना लवकरात लवकर कमी करता येतात. तसेच चालणं किंवा वजन उचलणं असं न करता ठरावीक स्नायू बळकट करण्याचं ट्रेनिंगही फिजिओथेरपीमध्ये दिलं जात.

हाडांच्या दुखण्यासारखेच वृद्धापकाळात सतावणारे दुसरे आजार म्हणजे पार्किन्सन्स, स्ट्रोक किंवा पक्षाघात. यातून बरे होण्यासाठीही औषधांबरोबर फिजिओथेरपीचा खूप मोठा वाटा आहे. या आजारांत व्यक्तीचा रोजच्या छोट्या छोट्या क्रिया करण्याचे नियंत्रण गेलेले असते.

काठी न घेता चालणे, एखादी वस्तू नीट उचलणे, आपापले कपडे घालणे, केस विंचरणे यासाठी लागणारे कोऑर्डिनेशन जमत नसते. अशावेळी फिजिओथेरपीची काही मशिन स्नायूंना ॲक्टिव्हेट करायला मदत करतात.

तसेच फिजिओथेरपिस्ट विविध व्यायाम करून घेऊन दैनंदिन क्रिया सहजतेने करायला शिकवतात. या आजारात दुसरी भीती तोल जाऊन पडण्याची असते. आधीच हाडे ठिसूळ झालेली असतात, त्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते.

फिजिओथेरपीमध्ये काही फॉल प्रिव्हेंशनचे व्यायामप्रकार आहेत. यात मुख्यत्वे मेंदूला ट्रेनिंग दिले जाते आणि पडण्याची भीती कमी होते. यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचे राहणीमान पूर्वपदावर येण्यास मदत होते.

Senior Citizen
World Senior Citizen's Day 2023 : ज्येष्ठांच्या मिळकतींबाबत कायदेशीर तरतुदी

काहीवेळा पूर्ण अंगावर पक्षाघाताचा परिणाम न होता केवळ चेहऱ्यावर होतो. याला ‘बेल्स पाल्सी’ म्हणतात. केवळ अर्धा चेहरा वाकडा दिसतो, हसणं वाकडं दिसतं. अशावेळी फिजिओथेरपी मशिन वापरून आणि चेहऱ्याचे काही व्यायाम करून चेहरा पूर्ववत करता येतो. कधी कधी वृद्ध व्यक्ती पाठीतून वाकलेल्या दिसतात.

प्रथम पाठीचा वरचा भाग वाकतो, म्हणजे पाठीला बाक किंवा कुबड येते. नंतर हळूहळू ती व्यक्ती अगदी कमरेपासूनच वाकते. याची सुरुवात काही वेळा कंबरदुखीपासून झालेली असते. थोडंसं वाकून उभं राहिलं, तर कंबर दुखणं जरा कमी होतं.

मग हळूहळू तशीच सवय लागते आणि दुखणाऱ्या कंबरेकडेही दुर्लक्ष करायची सवय लागते. वेळेवर फिजिओथेरपीची ट्रीटमेंट चालू केली, तर नक्कीच उपयोग होतो. तिसरा आणि उपेक्षित राहिलेला प्रश्न म्हणजे ब्लॅडर कंट्रोल किंवा लघवीवरील नियंत्रण (Urinary Incontinence). यावर ना औषध आहे, ना शस्त्रक्रिया!

वयामुळे स्नायूंची ताकद आणि नियंत्रण कमी झालेले असते. ब्लॅडरची मूत्र साठवण्याची क्षमताही कमी होते. ही तक्रार स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. मेनोपॉजनंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनच्या बदलामुळेही हा त्रास होऊ शकतो.

थोडंसं खोकलं किंवा शिंकलं तरी युरीन पास होते. कधी कधी तर हा त्रास इतका वाढतो, की सतत पॅड वापरावे लागतात. यात अजून एक धोका असा असतो, की घाईघाईने बाथरूम गाठताना पडण्याची भीती असते. याचा परिणाम सामाजिक जीवनावरही होतो. अशा व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे टाळू लागतात.

चारचौघांत फजिती व्हायची सतत धास्ती असते. अशावेळी फिजिओथेरपीने उपचार करता येतात. ब्लॅडरच्या स्नायूंना ट्रेन करता येते, बळकट करता येते.

अत्याधुनिक फिजिओथेरपी मशिनच्या वापराबरोबरच, त्याला व्यायामाची जोड देऊन हे साध्य करता येते. फिजिओथेरपिस्ट हे व्यायाम घटवून करवून घेतो आणि ते घरी करायचे प्रशिक्षणही देतो.

आंद्रे मार्वच्या आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तकात एक प्रकरण आहे, ‘द आर्ट ऑफ ग्रोइंग ओल्ड, ग्रेसफुली’. म्हातारपण सुखात कसे घालवावे? तर म्हातारपण शक्य तितके इतरांना उपद्रवी होणार नाही अशाप्रकारे सांभाळावे.

आपले शरीरस्वास्थ्य जर आपणच सांभाळले, तर मनही आनंदी राहते. आणि मग आपल्या कुटुंबाला लहानशा प्रमाणात का होईना आपण मदत करू शकतो; आणि असे पिकलेले आजी-आजोबा सर्वांनाच हवे असतात!

---------------------

Senior Citizen
Senior Citizens Vote from Home: ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार, नेमकी प्रक्रिया कशी असेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com