भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने १९८६मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) या संस्थेची स्थापना केली. आज जवळपास चार दशकानंतरही या संस्थेने फॅशन तंत्रज्ञान, फॅशन डिझाईन (अभिकल्प), व्यवस्थापन आणि निर्मिती या क्षेत्रांत आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समावेश होण्याएवढी गुणवत्ता मिळवली आहे. एनआयएफटीमधील शिक्षण आणि प्रशिक्षण सर्वोच्च दर्जाचे समजले जाते. या संस्थेने आपल्या अभ्यासक्रमात जगभरातील नवे प्रवाह आणि फॅशन तंत्रातील कल लक्षात घेऊन वेळोवेळी बदल केले आहेत.
या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने बंगळूर, जोधपूर, नवी दिल्ली, भोपाळ ,कांग्रा, पटणा, भुवनेश्वर, कन्नूर, रायबरेली, चेन्नई, कोलकाता, शिलाँग, गांधीनगर, श्रीनगर, मुंबई, पंचकुला, हैदराबाद आणि दमण अशा १८ ठिकाणी कॅम्पस उघडले आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्व विषयांसाठी एकत्रित जागा ५,२८९ आहे. सर्व कॅम्पसमध्ये उत्कृष्ट पायाभूत आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे देशाच्या विविध भागांतील शेकडो विद्यार्थी फॅशन तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेत आहेत.
फॅशन क्षेत्रातील सर्व प्रश्न, समस्या आणि आव्हानांचा प्रभावीरित्या सामना करता यावा यासाठी विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. सर्जनशीलता आणि उद्योगासाठी लागणारे तंत्र यांचा योग्य संगम साधण्यात संस्थेला यश आले आहे. त्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांना जगभरात करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात.