

Traditional Anarsa Recipe
esakal
अदिती परांजपे
सण-उत्सव म्हटले की घराघरांतून दरवळणारा फराळाचा घमघमाट मनाला भुरळ घालतो. त्यातही जाळीदार अनारसे व जिभेवर ठेवताच विरघळणारे चिरोटे फराळाच्या ताटाला चार चाँद लावतात. अशा या अनारसे खास बेत बघू या...
साहित्य
दोन कप जुना तांदूळ किंवा रेशनचा जाड तांदूळ, सव्वा कप किसलेला किंवा बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी खसखस, तळण्यासाठी तूप किंवा तेल, अनारसे थापण्यासाठी केळीचे पान किंवा दुधाची पिशवी, २ ते ३ चमचे दूध.
कृती
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यात सलग तीन दिवस भिजत घालावेत. तिसऱ्या दिवशी तांदळाचे पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे. निथळलेले तांदूळ एका सुती कपड्यावर फक्त सावलीत किंवा घरामध्येच पंख्याखाली पसरून ठेवावेत. तांदूळ पूर्ण कडक वाळवू नयेत. तांदळातील फक्त वरचे पाणी सुकले पाहिजे आणि हाताने दाबल्यास ओलावा जाणवला पाहिजे, तसेच तांदळाचा ओलसरपणा कायम राहिला पाहिजे इतपतच सुकवावे. आता तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक पिठासारखे दळून घ्यावेत. दळलेले तांदूळ चाळणीने चाळून बारीक पावडर करून घ्यावी. या तांदळाच्या पिठात गूळ घालावा. हे मिश्रण हाताने चांगले मळून त्याचा गोळा तयार करावा. गूळ विरघळून पिठात एकजीव झाला पाहिजे, जेणेकरून हाताने दाबून त्याचा गोळा तयार होईल. हा गोळा एका डब्यात घट्ट भरून ठेवावा आणि झाकण लावून तीन ते चार दिवस तसाच मुरण्यासाठी बाजूला ठेवावा.