Premium|Traditional Karanji Recipe : दिवाळीच्या फराळासाठी बनवा खव्याची आणि तिळाच्या गुळाची करंजी

Traditional Karanji Recipe : दिवाळीच्या फराळासाठी खव्याची आणि तिळाच्या गुळाची खुसखुशीत करंजी घरी बनवा. योग्य प्रमाणात मोहन, घट्ट पीठ आणि मंद आचेवर तळण्याच्या पद्धतीने करंजीला मिळेल सुंदर आकार आणि चव.
Traditional Karanji Recipe

Traditional Karanji Recipe

esakal

Updated on: 

मीनाक्षी काटकर

करंजीची नाजूक अर्धचंद्रकोर फराळाच्या ताटाची शोभा वाढवते. सुबक आकाराची चविष्ट करंजी करणे ही सुगरणीची परीक्षाच असते. अशा या करंज्या खवय्यांना खेचून घेतातच...

वाढप

३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्य

आवरणासाठी : दोन कप मैदा, २ मोठे चमचे बारीक रवा,

२ मोठे चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ, गरजेनुसार दूध किंवा पाणी.

सारणासाठी : दोन कप खवा, १ चमचा वेलची व जायफळ पूड, अर्धी वाटी काजू व बदामाची भरड, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती

मैद्यामध्ये रवा, मीठ आणि गरम तुपाचे मोहन घालून हाताने एकत्र करावे. या मिश्रणात थोडे दूध किंवा पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ तासभर ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे.

सारणासाठी खव्यात काजू व बदामाची भरड आणि वेलची व जायफळ पूड घालून चांगले एकजीव करावे. मळलेल्या पिठाचे लहान गोळे करून त्याच्या पातळ पाऱ्या लाटून घ्याव्यात. त्रिकोणी साच्यात पारी ठेवून तिच्या मध्यभागी एक ते दोन चमचे सारण भरावे. पारीच्या कडांना ओले बोट लावून साचा प्रेस करावा व करंजी अलगद काढावी. कढईत तूप किंवा तेल तापवावे. त्यात मंद ते मध्यम आचेवर करंज्या दोन्ही बाजूंनी हलक्या सोनेरी रंगावर खुसखुशीत तळून घ्याव्यात.

तिळाची करंजी

वाढप

३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्य

पारीसाठी : दोन कप मैदा, २ मोठे चमचे बारीक रवा, २ मोठे चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ आणि गरजेनुसार दूध किंवा पाणी.

सारणासाठी : दोन वाट्या तीळ, १ वाटी किसलेला गूळ,

१ चमचा वेलची पूड, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती

मैद्यामध्ये रवा, मीठ आणि गरम तुपाचे मोहन घालून हाताने एकजीव करावे. या मिश्रणात थोडे दूध किंवा पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ एक तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे. सारण तयार करण्यासाठी कढईत मंद आचेवर तीळ भाजून घ्यावेत. मिक्सरमध्ये तीळ व गूळ एकत्र वाटावेत. मैद्याच्या पिठाचे लहान गोळे करून त्याच्या पातळ पाऱ्या लाटाव्यात. त्रिकोणी

साच्यात पारी घालून पारीच्या मध्यभागी एक ते दोन चमचे सारण भरावे. पुरीच्या कडांना ओले बोट लावून साचा प्रेस करावा व करंजी अलगदपणे काढून घ्यावी. कढईत तूप किंवा तेल तापवून त्यात मंद ते मध्यम आचेवर करंज्या दोन्ही बाजूंनी हलक्या सोनेरी रंगावर खुसखुशीत तळून घ्याव्यात.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

ड्रायफ्रुट्स करंजी

वाढप

३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्य

पारीसाठी : दोन कप मैदा, २ मोठे चमचे बारीक रवा, २ मोठे चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ आणि गरजेनुसार दूध किंवा पाणी.

सारणासाठी : दोन वाट्या सुकामेव्याची भरड, १ वाटी पिठीसाखर, २ चमचे मिल्क पावडर, १ चमचा वेलची व जायफळ पूड, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती

मैद्यामध्ये रवा घालून त्यात मीठ आणि गरम तुपाचे मोहन घालावे व पीठ हाताने एकत्र करावे. या मिश्रणात थोडे दूध किंवा पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ एक तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे. सारण करण्यासाठी कढईत मंद आचेवर सुकामेव्याची भरड परतून घ्यावी. त्यात पिठीसाखर, वेलची व जायफळ पूड घालून चांगले एकत्र करावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर घालावी. मैद्याच्या पिठाचे लहान गोळे करून त्याच्या पातळ पाऱ्या लाटून घ्याव्यात. पारीच्या मध्यभागी एक ते दोन चमचे सारण भरावे. ओल्या बोटाने पारीच्या कडा दुमडून बंद कराव्यात व करंजी कटरने कापून घ्याव्यात. कढईत तूप किंवा तेल तापवावे. त्यात मंद ते मध्यम आचेवर करंज्या दोन्ही बाजूंनी हलक्या सोनेरी रंगावर खुसखुशीत तळून घ्याव्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com