

Travel Packing Tips for Resort Trip
Sakal
प्रवासासाठी पॅकिंग करताना आधी कुठे जाणार आहोत; देशात की परदेशात, डोंगराळ भागात की समुद्र किनाऱ्यावर, थंड हवेच्या प्रदेशात की उष्ण प्रदेशात, हे लक्षात घेतलं की पॅकिंग करणं सोपं जातं. आपण किती सामान उचलू शकतो याचा विचार करूनच बॅग भरायला हवी.
दोन वर्षांपूर्वी एका ट्रिपला गेले होते. तेव्हा जरा एक घोळ झाला होता, त्यामुळे अगदीच मोजकं सामान घेतलं गेलं सोबत. म्हणजे एकच जीन्स, दोन कार्गो पँट्स, चार ते पाच टी-शर्ट्स, नाइट ड्रेस आणि गरम कपडे. पण या एवढ्याच सामानात माझी सहा दिवसांची ट्रिप झालीसुद्धा. तेव्हा जाणवलं, की ‘हे हवं, तेही हवं, ते लागेल’ असं म्हणत आपण कारण नसताना किती सामान घेऊन फिरत असतो. एखादी गोष्ट नसली तरी बिघडत नाही आणि तेवढं चालूही शकतं. आपल्या गरजा नक्की किती आहेत हे अशावेळी कळतं. आपलीच गाडी सोबत असेल तर एकवेळ डिकीत सामान मावून जातं, पण सार्वजनिक परिवहन सेवा वापरायची तर सामान किती घ्यावं याचा विचार करायलाच हवा.