ईशान्य भारतातील एक सरोवर अभिनेत्री माधुरीच्या नावाने ओळखले जाते, हे माहितीये का?

Arunachal Pradesh and Assam places to visit: पहाटे सूर्योदयाच्या प्रसन्न वेळी विमानाने मुंबईहून गुवाहाटीकडे उड्डाण केलं. कधी ढगाआडून तर कधी निळ्या आकाशात केशरी रंगातील दिनकरराव दर्शन देत होते.
Arunachal Pradesh
Arunachal PradeshEsakal

अरुण तांबे

आजकालच्या धकाधकीच्या आणि चाकोरीबद्ध जीवनात मरगळलेल्या मनाला गरज असते ती बॅग पॅक करून मस्त भटकंतीसाठी बाहेर पडण्याची.

यातून मिळणारा, मनाला रिचार्ज करणारा प्रवासाचा अनुभव आपल्याला नवी दृष्टी देतो आणि जगणं अधिक समृद्ध करतो.

‘मी माझा सुंदर देश पाहू लागलो अन् त्यानंतर मला माझ्या सुंदर आयुष्याची ओळख झाली’, हे कुठेतरी वाचलेलं वाक्य ज्या कुणी लिहिलंय त्याने ते नक्कीच स्वानुभवाने लिहिलं असणार!

प्रवासाचा असाच एक नवा अनुभव घेण्यासाठी आम्ही ईशान्येच्या सेव्हन सिस्टर्सपैकी अरुणाचल आणि आसामवर शिक्कामोर्तब केले.

मुलगा अभिजित पर्यटनक्षेत्रात कार्यरत असल्याने त्याच्याकडून प्रवासाचा कार्यक्रम तयार करून घेतला आणि त्याप्रमाणे दिवाळीनंतर या पूर्वोत्तर राज्यात भेटीचं नियोजन केलं.

अर्थात कितीही नियोजन केलं तरी काही विघ्नं नसतील तर तो प्रवास लक्षात कसा राहणार? सगळी तयारी झाल्यावर आमचा निघण्याचा दिवस उजाडला तो विमानउड्डाण रद्द झाल्याच्या संदेशाने.

काय करायचं हा प्रश्न आ वासून पुढे उभा राहिला होता. अखेर भुर्दंड सोसत दुसऱ्‍या कंपनीच्या विमानाची तिकिटे काढली आणि मार्गस्थ झालो. पुण्याहून मुंबई आणि पुढे गुवाहाटी, तेजपुरमार्गे अरुणाचल.

पहाटे सूर्योदयाच्या प्रसन्न वेळी विमानाने मुंबईहून गुवाहाटीकडे उड्डाण केलं. कधी ढगाआडून तर कधी निळ्या आकाशात केशरी रंगातील दिनकरराव दर्शन देत होते.

आत्तापर्यंत समुद्र किनाऱ्यांवरून, गडकिल्ल्यांवरून सूर्योदय पाहिला होता, पण विमानातून सूर्योदयाचा सुंदर नजारा प्रथमच पाहिला आणि सोसलेल्या मनस्तापाचा शीण खूपसा हलका झाला.

गुवाहाटीला उतरल्यावर तिथे पुढील आठ-दहा दिवस आम्हाला प्रवासात साथसोबत करणारा चालकमित्र अन्वर आला होता. त्याच्याबरोबर आम्ही तेजपुरकडे निघालो.

१८० किलोमीटर अंतराच्या प्रवासाला चार तास लागतात. रस्त्याच्या दुतर्फा लांबवर पसरलेल्या चहाच्या हिरव्यागार मळ्यातून, तरारून आलेली भाताची चमचमणारी रोपे पाहत आम्ही तेजपुरला पोहोचलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते.

संध्याकाळी या शांत निवांत शहरातील काही प्रेक्षणीय स्थळे पाहिली. दाट वनराईत असलेलं चित्रलेखा उद्यान, गणेश मंदिर आणि खांबांवर कोरीवकाम केलेलं भैरवनाथ मंदिर पाहिलं. टेकडीवर असलेल्या अग्निघराची भेट छोट्याशा ट्रेकिंगचा अनुभव देऊन गेली.

घराघरातील प्रवेशद्वारांवर केळीचे खुंट आणि पणत्यांचा प्रकाश दिवाळीच्या तेजःपुंज वातावरणात भर घालत होता. सूर्योदय विमानातून पाहिला होता, सूर्यास्ताचे दृश्य ब्रह्मपुत्रेच्या काठावरून पाहताना झालेला आनंद काय वर्णावा...!

दुसऱ्या दिवशी तेजपुर सोडल्यावर अरुणाचलमधील बोमडिलाकडे निघालो. तेजपुर ते बोमडिला अंतर फक्त १०५ किलोमीटर, पण प्रवास सहा तासांचा.

वेळ आणि अंतर यांचा ताळमेळ घालण्याच्या भानगडीत न पडता निसर्गसौंदर्याने बहरलेल्या या प्रदेशात प्रवासाचा आनंद घ्यायचा हे मनाशी पक्कं ठरवलेलं होतं. एकीकडे पाईन वृक्षांची गर्द वनराजी तर दुसऱ्या बाजूने खळखळणारी निळसर कामेंग नदी.

थंडगार वाऱ्‍यांसोबत वळणावळणाच्या या रस्त्यांवरील प्रवास अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. वाटेवरील नागमंदिर पाहून आम्ही ८,५०० फूट उंचीवर असलेल्या बोमडिला या गावी पोहोचलो.

येथील प्रसिद्ध बौद्ध मठ (मॉनेस्ट्री) पाहायला गेलो तेव्हा आम्ही थंडीने गारठून गेलो होतो. ढगांच्या सान्निध्यात येथील निसर्गरम्य परिसर, स्वच्छ, नीरव शांत अन् धीरगंभीर वातावरणात मनाला प्रसन्नतेची अनुभूती मिळते.

बोमडिला इथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तवांगला निघालो. हिमालयाच्या उंच पर्वतरांगांवर कुठे बर्फाची चादर पसरलेली, तर कधी हिरव्या वनश्रीची शाल पांघरलेली. व्हॅलीचे नेत्रसुखद दर्शन घेत आम्ही चढत चाललो होतो.

वाटेत बाईकभ्रमंती करणारे तरुण पाहताना आपण मात्र आयुष्यात हे थ्रील मिस केल्याचं जाणवायचं. वाटेवर आर्मीचे कॅम्प दिसतात. येथील जवान आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असतात.

काही ठिकाणी अल्पोपाहार आणि प्राथमिक वैद्यकीय उपचार सुविधादेखील उपलब्ध असते. चढण चढत आम्ही १३,७०० फूट उंचीवर असलेल्या सेला पास इथे पोहोचलो, तेव्हा तेथील सेला लेकवर दाट धुके पसरले होते.

मधूनच डोकावणाऱ्‍या सूर्याच्या उन्हात थंडगार वाऱ्‍याने ती धुक्याची चादर दूर होऊन सरोवराचे निळेशार सौंदर्य अधिकच खुलून उठायचे. सतत बदलणाऱ्‍या निसर्गाच्या विविध रूपांचा हा सुंदर आविष्कार पाहत राहावा असाच.

Arunachal Pradesh
Maldives भारी की Lakshadweep सोशल मीडियावर का रंगलं युद्ध?

तिथून पुढे आम्ही जसवंतसिंग स्मारक या पवित्र ठिकाणी आलो. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात २१ वर्षीय जसवंतसिंग रावत यांनी देशासाठी शहीद होण्यापूर्वी ३०० शत्रू सैनिकांना अस्मान दाखवण्याचा पराक्रम याठिकाणी केला.

त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले आहे. युद्ध जिथे लढले गेले, त्या भूमीवरच हे स्मारक उभारले आहे.

या लढ्याचा इतिहास जाणून घेतल्यावर आपण अक्षरशः स्तंभित होतो. स्मारकापुढे नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो.

तवांगला संध्याकाळी पाच वाजता पोहोचलो, तेव्हा तिथे पूर्ण अंधार पडला होता आणि तापमान होते एक अंश सेल्सिअस.

थंडीने कुडकुडतच हॉटेलवर पोहोचलो. रूममधील हीटरच्या उबदार हवेत चहाचे घोट घेतल्यावर कुठे जरा बरे वाटले.

तवांग समुद्रसपाटीपासून अकरा हजार फूट उंचीवर आहे. वर लिहिल्याप्रमाणे अरुणाचल तीन देशांच्या सीमेवर असल्याने या राज्याचे महत्त्व देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोठं आहे. त्यातही तवांगचा भाग अगदीच सीमेला लागून असल्याने अधिक संवेदनशील आहे.

१९६२च्या युद्धात चीनने लडाख आणि तवांगमधून त्यांचे सैन्य घुसवले होते. अजूनही या भागात चाललेल्या त्यांच्या कुरापती विविध माध्यमातून आपल्या कानावर येत असतात. अर्थात प्रतिकारासाठी आपले सामर्थ्यशाली सैन्य कायमच सज्ज असते.

आपल्याला या तणावपूर्ण स्थितीची काळजी वाटत असली, तरी प्रत्यक्षात मात्र येथील लोकांचे नित्याचे व्यवहार सुरळीत चालू असतात.

मुख्यतः बौद्ध विचारसरणीचा प्रभाव असणाऱ्या या भागातील लोक शांत, सुस्वभावी आणि अगत्यशील आहेत. सदा हसतमुख असणाऱ्‍या या लोकांचे राहणीमान साधे असले, तरी त्यातही टापटीप दिसते.

या प्रवासात खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम येत नसला, तरी इथे आल्यावर मोमो आणि नूडलची चव चाखायलाच हवी.

मॉल, मल्टीप्लेक्स, झगमगाटी रेस्टॉरंट संस्कृती अजून तरी इथे रुजलेली नाही. या भागात दिवस पहाटे पाचला उजाडतो आणि संध्याकाळी पाचला मावळतो. उन्हाळ्यात दिवस- रात्रीतील अंतर जरा कमी असावे.

Arunachal Pradesh
Cheap Hotels In Goa : गोव्यात महागड्या हॉटेलवर पैसे खर्च करू नका, इथे रहा, निम्म्याहून अधिक पैसे वाचतील

बोमडिलाहून तवांगला आल्यावर रात्रीची विश्रांती झाल्यावर आम्ही दुसरे दिवशी सकाळी लवकर भारताच्या सीमारेषेवर (लाइन ऑफ ॲक्चुअल कन्ट्रोल) बुम ला पास इथे निघालो.

सुंदर सरोवराच्या काठाने, उंच काळ्या पहाडाच्या रांगांमधून दिसणारी हिमशिखरे, लांबवर दिसणारे वळणावळणाचे रस्ते... अवाक् करणारे हे दृश्य आम्ही कॅमेऱ्‍यात बंदिस्त करत पुढे जात होतो.

हिमालयाच्या अवाढव्य रूपापुढे मानवाचे अस्तित्व किती सूक्ष्म आहे याची जाणीव इथे होते. १५,२०० फुटांवर बुम ला पास इथे आम्ही पोहोचलो त्यावेळेच्या भावना शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. दुपारी बारा वाजता स्वच्छ ऊन असूनही इथे कडाक्याची थंडी होती आणि वारे वाहत होते. विरळ हवामान जाणवत होते, पण कुणाला त्रास झाला नाही.

येथील जवान येणाऱ्‍या सर्वांचे स्वागत करताना काळजीपूर्वक विचारपूस करून रजिस्टरमध्ये नोंद करीत होते. इथे चहा, कॉफी आणि स्नॅक्स तर होतेच शिवाय तब्येत बिघडल्यास प्राथमिक उपचारांची व्यवस्थाही होती.

जवानांनी जमलेल्या सर्वांना काही महत्त्वाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सांगितले आणि त्यानंतर त्या भागाची माहिती दिली. आयुष्यात कधीही न विसरता येणारे असे ते दुर्मीळ क्षण होते. रात्रंदिवस कर्तव्यतत्पर असलेल्या सैनिकांना मी आदराने सॅल्युट केला तेव्हा ते अगदी सौहार्दपूर्ण शब्दांत म्हणाले..

‘देश की रक्षा ये तो हमारा फर्ज है और हम उसे निभा रहे है....’ परत फिरताना ते दृश्य डोळ्यासमोरून हलत नव्हते. इथे येऊन आपल्या सैनिकांना भेटल्यावर एक तीर्थयात्रा केल्याचे भाग्य आम्हाला मिळाले होते.

तिथून आम्ही शंगेतसर सरोवर पाहायला आलो. अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अद्‍भुत नमुना म्हणजे हे सरोवर. असे सुंदर नैसर्गिक सरोवर आम्ही यापूर्वी कधी पाहिले नव्हते. तिथे पोहोचण्यासाठी पक्का रस्तादेखील नव्हता.

अशा या ठिकाणी कोयला चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या गाण्याचे शूटिंग झाले होते. तेव्हापासून हे सरोवर ‘माधुरी’ नावाने ओळखले जाते. बाजूला असणाऱ्‍या आर्मीच्या कॅन्टीनमध्ये गरमागरम छोले भटुरे, नूडलचा आस्वाद घेता येतो.

परतीच्या वाटेवरही काही सुंदर सरोवरे लक्ष वेधून घेतात. तवांग येथील वॉर मेमोरिअलदेखील आवर्जून पाहायलाच हवे असे स्मृतिस्थळ आहे. १९६२चे चिनी आक्रमण परतवून लावताना आपल्या २,४२० अधिकारी आणि जवानांना वीरमरण आले.

त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे. या जवानांची त्यांच्या रेजिमेंटसह नावे, त्यावेळेस वापरलेली शस्त्रे, छायाचित्रे, स्मृतिस्तंभ आणि युद्धाची माहिती आपल्याला पाहायला मिळते.

संध्याकाळी येथील लाइट ॲण्ड साउंड शो पाहायलाच हवा. याचठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारला आहे.

Arunachal Pradesh
Video: एकीकडे प्राणप्रतिष्ठा, तर दुसरीकडे राहुल गांधी रस्त्यावर बसून 'रघुपती राघव राजाराम' का गात आहेत?

तीनशेहून अधिक वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली आशिया खंडातील दुसरी मोठी बौद्धगुंफा पाहिल्याशिवाय तवांगची ट्रिप पूर्ण होऊ शकत नाही. मठाच्या मुख्य प्रासादात गेल्यावर समोर गौतमबुद्धांची वीस फूट उंचीची प्रसन्न मूर्ती दिसते.

खूप मोठा परिसर असलेली ही गुंफा दहा-बारा किलोमीटर अंतरावरूनही अगदी सहज दृष्टीस पडते. तिबेटी जनजीवन, परंपरा आणि सांस्कृतिक विचारधारेची ओळख इथे होते. एकूणच तवांगसाठी आपण प्रवासाचे तीन दिवस राखून ठेवायला हवेत.

नयनरम्य सृष्टीसौंदर्य डोळ्यात साठवत परतीचा प्रवास सुरू होतो अन् किशोरचं हवाओं पे लिख दे हवाओं के नाम, हम अंजाने परदेसीयों का सलाम... गाणं ओठावर येतं.

वाटेत न्युरानंग हा प्रसिद्ध धबधबा आणि वीजनिर्मिती केंद्र पाहिले अन् संध्याकाळी दिरांग या गावात आलो. गाव छोटंसंच, पण निसर्गाचं वरदान लाभलेलं.

गरम पाण्याचे झरे याबरोबरच किवी आणि सफरचंदाच्या इथे बागा आहेत. दिरांगमधील बौद्धमठ म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या वास्तुकलारचनेचा एक अत्यंत उत्कृष्ट आविष्कार आहे.

या परिसराचे अप्रतिम सौंदर्य पाहताना इथून बाहेर पडूच नये असे वाटते. हा सर्व परिसर पहाण्यासाठी एक मुक्काम इथे व्हायला हवा. या भागात ठिकठिकाणचे हे बौद्ध मठही आपापले खास वैशिष्ट्य राखून आहेत.

अरुणाचलला बायबाय करत जवळपास तीनशे किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी काझीरंगा इथे आलो. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या राष्ट्रीय अभयारण्यात हत्ती, वाघ, बिबटे अन् रानगवे आहेत.

भल्या पहाटे ते पाणवठ्यावर येतात असं कळल्यामुळे आम्ही पहाटे साडेचारला तिकडे गेलो. वाघ, बिबटे नाही पण गेंडे आणि रानगवे मुक्तपणे फिरताना दिसले. झाडांवर, पाणथळ जागी पक्ष्यांचे थवे दिसतात.

पक्षीनिरीक्षण करण्यासाठी दुर्बीण किंवा झूम लेन्सचे कॅमेरे मात्र जवळ असायला हवेत. पूर्ण अभयारण्य पाहण्यासाठी किमान पाच-सहा दिवस लागतात.

अभ्यासपूर्ण निरीक्षण करायचे असेल तर इथे तळ ठोकूनच बसायला हवे. पण हा झाला अभ्यासकांनी करण्याचा विचार. आम्ही या घनदाट जंगलात जीपसफारीचा आनंद घेतला आणि निघालो.

Arunachal Pradesh
Old Tree In England : इंग्लंडमधील 200 वर्षे जुने झाड तोडले अन् सुरू झाला राडा, काय होतं असं विशेष?

प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आता आम्ही गुवाहाटीला निघालो. वाटेत टाटांची भलीमोठी टी इस्टेट पाहत फोटोसेशन केले. गुवाहाटीत कलाक्षेत्रम हे आसामी संस्कृतीचे दर्शन घडवणारे म्युझियम, प्रसिद्ध कामाख्या मंदिर, नवग्रह मंदिर आणि खूप मोठे शिवलिंग असणारे शिवमंदिर पाहिले.

संध्याकाळ ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझवर एन्जॉय केली. शहरी भागातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर केलेला हा प्रयत्न असावा.

गोव्यासारखेच आसामी लोकही चविष्ट, भोजनप्रिय अन् स्वभावानं रसिक आणि संगीतप्रिय. हसतमुख चेहऱ्‍याच्या या लोकांचे उच्चार ऐकायला गोड वाटतात. आपल्या लतादीदी तसे इथे भूपेन हजारिका. दोघेही भारतरत्न सन्मानित!

त्या दहा दिवसांत आमचा भरपूर प्रवास झाला. हिमालयाचे अद्‍भुत दर्शन घेताना निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या अरुणाचल आणि आसाममधील नवे प्रदेश, नव्या संस्कृती पाहिल्या. अनेक अपरिचितांशी ओळखी झाल्या.

गुवाहाटीला आम्हाला साथसोबत करणाऱ्‍या अन्वरला निरोप देताना मन थोडं हळवं झालं होतं. शेवटी आपण सगळे जयवंत दळवींच्या पुस्तकातील ‘सारे प्रवासी घडीचे’!

पर्यटनाबरोबर देशाच्या सीमेचे दर्शन घडवणारे, शूर जवानांची भेट घडवणारे आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना वंदन करण्यासाठी केलेलं हे ईशान्येकडील तीर्थाटन आयुष्यभर स्मरणात राहील.

-----------------------

Arunachal Pradesh
National Tourism Day : बघा, हिरवे हिरवे गार गालिचे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com